तळेघर ग्रामीण रूग्णालयासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर

सिताराम काळे, घोडेगाव

तळेघर (ता.आंबेगाव) येथील ग्रामीण रूग्णालयाच्या दुस-या टप्याच्या कामासाठी १३ कोटी ५१ लाख १७ हजार रूपयांच्या आराखडयास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर ग्रामीण रूग्णालय ३० खाटांच्या क्षमतेचे असुन राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मंजुर करण्यात आले आहे. भीमाशंकर, आहुपे, पाटण भागातील व खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी परिसरातील नागरिकांसांठी तळेघर ग्रामीण रूग्णालयाचा उपयोग होणार आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी ४ कोटी ५० लक्ष रूपये मंजुर केले व इमारत बांधून पुर्ण झाली. त्यानंतर दुस-या टप्यात या कामासाठी १३ कोटी ५१ लाख १७ हजार रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली. या निधीतुन डॉक्टर, कर्मचारी निवासस्थाने, रूग्णालयाच्या इमारतीचा वरचा मजला, रेन वॉटर, हर्वेस्टींग, सोलर एनर्जी पाईप लाईन, ऑक्सिजन व्यवस्था, जनरेटर, पार्कींग, सिसिटीव्ही, लिफ्ट सुविधा करण्यात येणार असुन त्याचबरोबर इतरही रूग्णालय अंतर्गत अत्यावश्यक कामे होणार आहे.

सध्या तळेघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी तातडीच्या अत्यावश्यक सेवा, सुविधा पुरविणे शक्य होत नव्हते. तसेच श्री क्षेत्र भीमाशंकरकडे येणारे भाविक, पर्यटक व नागरिक यांना तत्पर वैदयकिय मदत देण्यावर मर्यादा येत होत्या. आता तळेघर येथील ग्रामीण रूग्णालय सुरू झाल्यावर या भागातील व परिसरातील आरोग्य विषयक प्रश्न बहुतांशी मिटणार आहे.

Previous articleजुन्नरच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गौरव
Next articleठरलेल्या वेळेत फ्लॅटचे काम पूर्ण करून न दिल्याने बिल्डर विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल