स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता हरीश कानसकर याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल

Ad 1

प्रमोद दांगट , निरगुडसर

आंबेगाव तालुक्यासह खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यात स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणारा अट्टल खंडणीबहाद्दर हरीश कानसकर याच्याविरोधात धमकावून खंडणी मागण्याच्या तक्रारीवरून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले आहे.कानसकर याच्याबाबत मंचर पोलीस ठाण्याकडे तक्रारी आल्या होत्या. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पो.नि. कोरे यांनी आक्रमक कारवाई सुरु केली आहे. कानसकर या व्यक्तीला न घाबरता या व्यक्ती बाबत काही तक्रारी असल्यास मंचर पोलिसांना माहिती द्या असे जाहीर आवाहन केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी मंचर पोलीस ठाण्यात कानसकर विरोधात, धमकावणे, खंडणी मागणे याबाबतच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील एका गावच्या हॉटेल वर येऊन हरीश कानसकर याने हॉटेल मालकास तुमचे हॉटेल रात्री ११ वाजल्याच्या नंतर सुरु असल्याची माझ्याकडे तक्रार आली आहे. मी आरटीआय कार्यकर्ता असून तुमचा अर्ज मी पोलिस स्टेशनला करणार आहे तुमचे हॉटेल चालवायचे असेल तर मला दर महिन्याला दहा तारखेला एक हजार रुपये हप्ता म्हणून द्यावा लागेल अशी धमकी देत पैशाची मागणी वेळोवेळी करून ५ हजार रुपये घेतले असल्याचे एका फिर्यादीने तक्रारीत सांगितले आहे.

तर दुसऱ्या फिर्यादीनुसार एका शेतकऱ्याकडून खडकाळ जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या मोबदल्यात त्यांनी आपल्या जमिनीतील काही मुरूम सर्व शासकीय परवानगी घेऊन तो मुरूम एका कंपनीला कामासाठी दिला होता. ही कंपनी सर्व परवानगी घेऊन मुरूम उत्खनन करण्यासाठी आले असता हरीश महादू कानसकर ( रा.रांजनी ता.आंबेगाव जि. पुणे ) यांनी घटनास्थळी येऊन मोबाईल मध्ये शूटिंग काढून तुम्ही मुरूम उत्खनन करायचे नाही नाहीतर मी तहसीलदार, कलेक्टर ला फोन करीन तुमच्या विरोधात अर्ज करेल. तुम्ही मला ओळखत नाही माझ्याबद्दल रांजनी, थोरांदळे, मधील लोकांना विचारा मी काय काय करू शकतो.असे धमकावून तुम्हाला जर मुरूम उत्खनन करायचे असेल तर मला ५० हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर मी तुमचे काम कसे चालू राहते तेच बघतो असे म्हणत वारंवार धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी घेऊन गेले असल्याचे तक्रारदार शेतकऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच तिसऱ्या फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी व त्यांचा भाऊ यांचा जमिनीचा वाद होता. या गोष्टीचा फायदा घेत हरीश कानसकर हा फिर्यादी यांना भेटला व म्हणाला की तुमच्या आईने बनवलेल्या मृत्यू पत्रातून तुमच्या भावाला कायमचा बाहेर काढतो. मी पाषाण रोड एस.पी.ऑफीसला विशेष पोलीस अधिकारी असून माहितीचा अधिकारी म्हणून काम करत आहे. मी तुम्हाला मदत करतो असे सांगितले. फिर्यादी यांच्याकडून कागदपत्रे काढण्यासाठी व पुणे व मुंबई येथे पत्र व्यवहार करण्यासाठी १० हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या बहिणीच्या मुलगा याला वारंवार फोन करून पैसे दिल्याशिवाय तुमचे जमिनीचे काम होणार नाही असे सांगून त्याला व फिर्यादी यास राहत्या घरी बोलावून १५ हजार रुपये घेतले आहे. कानसकर याने दिनांक ३ नोव्हेंबर २०२० ते ९ डिसेंबर २०२० या काळात वेळोवेळी एकूण २५ हजार रुपये घेतले असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. अशा प्रकारे अट्टल खंडणीबहाद्दर तथाकथित समाजसेवक हरीश कानसकर याने तालुक्यातील शेतकरी, हॉटेल व्यावसायिक , व्यापारी, शासकीय अधिकारी व अनेकांना मी आरटीआय कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे, विशिष्ठ पोलीस अधिकारी आहे असे सांगून फसवणूक करून, धमकावून खंडणी वसूल केली आहे.

कानसरकर याचा गैरप्रकार अनेक वर्षांपासून आंबेगाव तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये खुलेआम सुरु होता, अशी माहिती नागरिक नाव ना सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत. परंतु मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी खंडणीबहाद्दर कानसकर विरोधात आक्रमक पाऊल उचलून त्याच्या चारही मुंड्या चित करून त्याला कायद्याचा वचक दाखवला आहे. परंतु कानसकर हा अद्यापही फरार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अजूनही ज्या नागरिकांच्या कानसकर किंवा यांच्यासारखे फसवणूक करून, धमकावून खंडणी उकळून नागरिकांना त्रास देणाऱ्या विरोधात तक्रारी असतील तर पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे ( संपर्क क्रमांक – ७९७७५६९५४४ ) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे पो. नि. कोरे यांनी सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास पी.एस.आय.जाधव मॅडम पी. एस.आय.खबाले, पी. एस. आय.शिंदे करत आहे