मंचर येथील प्रांत कार्यालय घोडेगाव येथे आणण्याची मागणी

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्याची राजधानी असलेल्या घोडेगाव शहरात विविध शासकिय कार्यालय व विविध संस्थांच्या आवारात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मंचर येथील प्रांत कार्यालय घोडेगाव मध्ये आणावे अशी मागणी यावेळी झालेल्या शासकिय चहापानाच्या कार्यक्रमात घोडेगाव ग्रामस्थांनी केली.

प्राथमिक शाळा, घोडेगाव न्यायालय, पंचायत समिती व बी.डी.काळे महाविद्यालयाच्या आवारात ध्वजारोहन झाले. त्यानंतर तहसिल कार्यालयाच्या आवारात शासकिय ध्वजारोहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार व घोडेगाव मधिल मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन, विविध कवायती असे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत अतिशय साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला.

तहसील कार्यालय घोडेगाव येथे झालेल्या शासकिय चहापानाच्या कार्यक्रमात घोडेगाव ग्रामस्थांनी मंचर येथील प्रांत कार्यालय घोडेगाव येथे आणावे अशी मागणी केली. घोडेगाव मध्ये असलेली शासकिय कार्यालये गावाच्या बाहेर आल्याने जुन्या इमारती पडून आहेत, तेथे प्रांत कार्यालयाला अतिशय सुसज्ज जागा आहे. तरी हि घोडेगाव ग्रामस्थांची मागणी तहसिलदार यांनी शासन दरबारी कळवावी असा ठराव शरद बँकेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव काळे यांनी मांडला तर याला पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, समता परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशनाना घोडेकर व उपस्थित सर्व घोडेगाव ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.

तसेच शासकिय ध्वजारोहन कार्यक्रमास अनेक विभागांचे अधिकारी, कर्मचारी हजर नव्हते, या गैरहजर असलेल्यांना समज द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे केली.

Previous articleशिरूर – तरूणावर गोळीबार करणारे एन.जे.साम्राज्य टोळीचे सदस्य पोलिसांच्या जाळ्यात
Next articleनारीशक्ती च्या एकजुटीतून देश प्रगतीपथावर येईल – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश