आंबेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कातकरी आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण

सिताराम काळे घोडेगाव

प्रजासत्ताक दिनी दिल्ली व संपूर्ण देशभर आपल्या न्याय हक्कांसाठी शेतकरी लढत आहे व आंबेगाव तालुक्यातील कातकरी आदिम जमातीचे बांधव आपल्या सांविधानिक हक्कांसाठी २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषनास बसले आहेत.

सन २०११ च्या जनगणनेनुसार बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र सुमारे १० हेक्टरच्या आसपास असुन २६ निवासी घरे आहेत. याठिकाणी मुख्यतः आदिम जमाती कातकरी समाजाचे वास्तव्य आहे. परंतु कातकरी समाजाच्या घरांची नोंद कोणत्याच ग्रामपंचायतीला न झाल्यामुळे त्यांना कोणत्याही नागरी सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत. यासाठी ग्रामस्थ, शाश्वत संस्था व किसान सभा सतत पाठपुरावा करत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून पंचायत समिती आंबेगाव यांनी परिपुर्ण प्रस्ताव पुणे जिल्हा परिषद यांना पाठवला व पुणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून व आवश्यक त्या ठरावासह तो विभागीय आयुक्त पुणे यांना २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सादर केला व विभागीय आयुक्त कार्यालयाने २० डिसेंबर २०१७ रोजी सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी ग्रामविकास विभाग मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यांनी सन २०१८ ला काही त्रुटी काढून हा प्रस्ताव पुन्हा पाठवला होता. परंतु या त्रुटींची सन २०१८ पासुन जिल्हा प्रशासन यांनी कोणतीच पुर्तता केली नाही. त्यामुळे या प्रस्तावावर अदयाप पर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा व डिंभे धरणाचे बुडित आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र लगतच्या ग्रामपंचायतला जोडण्यात यावे किंवा त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी किसानसभा आंबेगाव तालुका समितीने विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, आंबेगाव तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. व या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास २६ जानेवारी पासुन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने आपल्या सांविधानिक हक्कांसाठी २६ जानेवारी रोजी जुना आंबेगाव येथे बेमुदत उपोषनास बसले आहेत. जुना आंबेगाव येथे कातकरी बांधव उपोषनास स्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी भेट दिली.

हा प्रश्न सुटण्यासाठी शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे सातत्यपुर्ण प्रयत्न करीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभा आंबेगाव तालुका समिती उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी व स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

Previous articleपुणे जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण २९ जानेवारीला
Next articleश्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न