बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा, तसेच विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.

बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली.

यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, संभाजी होळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून बारामती शहरातील तसेच तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार करावीत, कामे वेळेत करावीत,कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामात दुर्लक्ष करू नये,आवश्यक त्याठिकाणी वन विभागाची परवानगी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तलावास भेट दिली. सुशोभित केलेल्या पाझर तलावाचे काम पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. पाझर तलावाच्या सभोवती ओपन जिम आणि प्ले ग्राउंड तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पदाधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या ‘आयटीआय’ इमारतीच्या कामाची पाहणी त्यांनी केली. सुपे येथील नियोजित मार्केट, पोलीस स्टेशनच्या जागेची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या इमारतीच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.

Previous articleनवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय योजना सर्व सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा- आमदार अशोक पवार
Next articleउत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिपक हरण यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव