किसान सभेचे आंदोलन स्थगित

सिताराम काळे, घोडेगाव

-प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर (ता. आंबेगाव) येथील ढिसाळ कारभारामुळे स्थानिक आदिवासी बांधवांचे प्राण गेलेले आहेत. अदयापही तेथील परिस्थिती जैसे थे आहे. संबधित डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी किसान सभा आंबेगाव यांनी बुधवारी धरणे आंदोलन सुरू केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या बरोबर दि. २३ रोजी झालेल्या चर्चेतुन मार्ग काढण्यात आला. संबंधित विषयांवर तातडीने निर्णय घेण्याचे ठरल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

पुणे जिल्हा परीषद येथे दुपारी १२ वाजता संघटनेच्या शिष्टमंडळासोबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, आदिवासी विकास निरीक्षक योगेश खंडारे, किसान सभेच्या किरण मोघे, अॅड. नाथा शिंगाडे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, अशोक पेकारी, दत्ता गिरंगे, नंदाताई मोरमारे, लक्ष्मी आढारी, डॉ. अमोल वाघमारे, लक्ष्मण मावळे आदि उपस्थित होते.

किसान सभेचे शिष्टमंडळ व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार गरोदर माता व तिचे बाळ यांच्या बाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेनंतर समितीच्या सुचनेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील असलेले प्राथमिक आरोेग्य केंद्र, भरारी पथके यांची संबंधित ठिकाणी रूग्ण कल्याण समिती व किसान सभेचे पदाधिकारी यांच्याबरोबर दर महिन्याला बैठक बोलावून अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील उपकेंद्रांची स्थिती सुधारावी यासाठी त्वरीत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. आदिवासी भागातील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी महिन्यातून एक दिवस स्त्री रोग तज्ञ व बाल रोग तज्ञ भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे. घोडेगाव येथे सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Previous articleघोडनदीत अवैध्यरित्या वाळुचा उपसा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
Next articleवाघोलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर आमदार अशोक पवार यांची चर्चा