आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कलम १४४ लागू

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायत निवडणुकीची १८ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी गर्दी केल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेशान्वये कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा, इशारा घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.

तालुक्यात दि. १८ रोजी विजयी गटातील उमेदवार, कार्यकर्ते, समर्थक मोठया प्रमाणात एकत्रीत येवून ते आपल्या विजयी उमेदवारांची विजयी मिरवणुक, रॅली काढणे, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडणे, विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळणे, परवानगी शिवाय बॅनर, फ्लेक्स लावणे याप्रकारे कृत्ये करू शकतात.

या पार्श्वभूमिवर दोन गटांमध्ये किंवा दोन जातींमध्ये, धर्मांमध्ये वाद निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी दि. १८ रोजी गर्दी करण्यास प्रतिबंध करणे आवश्ये असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस व इतर प्रशासनाला दिले आहे.

तसेच ढाबे, हॉटेल, पान टप-या इत्यादी दि. १८ ते १९ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

Previous articleघोडेगाव बसस्थानकात महिलेच्या बॅगमधील ३० हजार रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांने लांबविली
Next articleआंबेगाव तालुक्यात ४१ हजार ६१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला