कचऱ्याचे ढीग तत्काळ हटवा अन्यथा आंदोलन खासदार कोल्हे व आमदार तुपे यांचा महापालिका प्रशासनाला इशारा

अमोल भोसले,पुणे

हडपसर रामटेकडी कचरा प्रक्रिया प्रकल्पातील ओपन डम्पिंग बंद करून तेथील कचऱ्याचे ढीग तत्काळ हटवा अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबण्याबरोबरच आंदोलन करण्याचा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत, याची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे, आमदार तुपे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक योगेश ससाणे, अशोक कांबळे, नगरसेविका वैशाली बनकर, नंदाताई लोणकर, माजी नगरसेवक फारुक इनामदार, सुनील बनकर, स्वीकृत सदस्य अविनाश काळे, परिसरातील सोसायट्यांचे व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कचरा प्रक्रिया केंद्राला अचानक भेट दिल्यामुळे तिथे साठवलेल्या कचऱ्याचे डोंगर दृष्टीपथास पडताच डॉ. कोल्हे यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कचऱ्यावरील प्रक्रिया अशारितीने केली जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इथे कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसून एक-दोन मशीन्सद्वारे केवळ कचरा क्रश करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत होते. शिवाय दैनंदिन आणला जाणारा कचरा व प्रक्रिया करण्याची क्षमता यात मोठी तफावत असल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहात असल्याचे स्पष्ट दिसून आले.

रामटेकडी कचरा प्रक्रिया प्रकल्पांची अवस्था गंभीर असल्याचे जाणवतात डॉ. कोल्हे यांनी पुणे मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. दोन महिन्यांपूर्वीच्या बैठकीत चार दिवसात सर्व कचरा हलविण्यात येऊन ओपन डम्पिंग बंद केले जाईल असे आश्वासन दिले होते याची आठवण करून देत कचऱ्याचे ढीग हटवले तर नाहीच उलट आणखी कचरा आणून टाकण्यात आला असल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. तसेच तत्काळ कारवाई करुन ओपन डम्पिंग बंद करून कचऱ्याचे ढीग न हटवल्यास एनजीटीकडे दाद मागू पण त्याचबरोबर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार तुपे यांनी दिला.

Previous articleवडगाव कांदळी येथे मतदारांना पाच लिटरचे तेलाचे कँड वाटून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Next articleमंचर बसस्थानकात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक