लग्नमंडपात शेवटची मंगलाष्टका सुरू असतानाच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

चिलवडी (ता. कर्जत) येथील लग्नात शेवटची मंगलाष्टक सुरू होते आता सावध सावधान म्हणाल्यानंतर आपण आपल्या जीवनसाथीला स्वताच्या नावाचे मंगळसूत्र व पुष्पहार घालून कायमची अर्धांगिनी करण्याचे स्वप्न पाहत असतानाच अचानक नवरदेवास तीव्र स्वरूपाचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने अचानक तो मंडपातच कोसळला. सर्वांची एकच धावपळ उडाली. क्षणातच होत्याचे नव्हते झाले आणि पूर्ण मंडप स्तब्ध झाला.

कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील मुलीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा येथील पंचवीस वर्षांच्या युवकाबरोबर विवाह ठरला होता. रविवारी ठरल्या दिवशी लग्नातील सर्व धार्मिक विधी सकाळी उरकले गेले. हळदी व इतर सर्व रिवाज आनंदात आणि उत्साहात पार पडले. पारण्यात डीजेच्या तालावर नवरदेवासह मित्रमंडळीही आनंदाने नाचली. नवरदेव आणि सर्व पाहुणे मंडळी आनंदाने मंडपात विराजमान झाली. दुपारी एकच्या सुमारास शुभविवाहाच्या मुख्य विधीला सुरूवात झाली. वधू आणि वरांचे मामा पाठीमागे पुष्पहार आणि गुच्छ घेऊन उभे होते. दोन्ही विहीणबाई मोठ्या आनंदात पाहुण्यांचे स्वागत करीत होत्या. मान्यवरांनी आशीर्वाद देऊन झाले.

शेवटची मंगलाष्टकातील आता सावधान समयो…असे बोल म्हटले जात होते. तेवढ्यात वराच्या छातीत तीव्र स्वरूपाची कळ निघाली आणि तो खाली कोसळला. मंडपात एकच धांदल उडाली. आनंदाचे फुललेले चेहरे दुःखाने आणि चिंतेने ग्रासले गेले. तातडीने नवरदेवाला गाडीत घालून उपचारासाठी नेण्यात आले. परंतु काही वेळाने त्याच्या मृत्यूची दुःखद बातमी आली आणि सारे होत्याचे नव्हते झाले. अवघ्या काही काळात आनंदाचे वातावरण असलेल्या पाहुण्यात आणि मंडपात स्मशान शांतता पसरली.

Previous articleअवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई
Next articleग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाळुंगे पोलीसांचा रूट मार्च