ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून लोणी काळभोर येथे दोन गटात तुफान हाणामारी

सुचिता भोसले,लोणी काळभोर- ग्रामपंचायतीचा प्रचार जोरदार सुरू असताना निवडणुकीला गालबोट लागल्याची घटना घडली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातुन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटात मंगळवार (दि. १२) रोजी मध्यरात्रीच्या समारास लोखंडी गज, व लाकडी दांडगे वापरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या हाणामारीत दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्हीकडील कार्य़क्त्यांच्या गळ्यातील साडेआकरा तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांसाठी पंचवार्षिक निवडणुक येत्या शुक्रवारी (ता. १५) होणार आहे. या निवडणुकीसाठी यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व हवेली तालुका कॉग्रेसचे (आय) चे माजी अध्यक्ष शिवदास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेल व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व लोणी काळभोरचे माजी सरपंच शऱद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेल या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. दोन्ही गटांनी निवडणुक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड व भेद या नितीचा वापर सुरु केला आहे. यातुनच मंगळवारी पाषानकर बागेत ही भांडणे झाली महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचे पाषानकर बागेत जनसंपर्क कार्यालय असुन, या कार्यालयावर प्रशांत काळभोर यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याने, वरील प्रकार झाल्याचा आरोप राहुल काळभोर गटाने केला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर गटाच्या शुभम तात्यासाहेब काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, राज उर्फ विशाल प्रताप काळभोर, गुरूदेव दत्तात्रय काळभोर, सौरभ दयानंद काळभोर, शुभम विलास काळभोर, निखील धोंडीबा काळभोर, वैभव आनंदा काळभोर, रोहीत गिरी, निलेश धोंडीबा काळभोर, शुभम प्रदिप क्षीरसागर व सिध्देश्वर प्रदिप क्षीरसागर या अकरा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर प्रशांत काळभोर गटाच्या सौरभ दयानंद काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्यासह युवराज रामचंद्र काळभोर, गणेश सुखदेव काळभोर, नितिन ज्ञानोबा काळभोर, आदित्य तुपे, किशोर मदणे, सीताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रवीण राजाराम काळभोर, अमित माणिक काळभोर, शुभम तात्यासाहेब काळभोर या अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात हाणामारीचे सिसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरु केली याचा तपास चालु आहे. रात्रीच्या प्रकारामुळे पुढील दोन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रचार सभांना परवानगी नाकारली आहे. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन, यापुढील काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांना गडबड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही दिलेल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. बोरकर व पो. उप .नि.एन. टी. रनवरे करत आहे.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकां मध्ये गोंधळ व गैरप्रकार केल्यास कोणाचीही गय नाही – स.पो. निरीक्षक दत्तात्रय गुंड
Next articleऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला मोटारसायकलची धडक : दुचाकीस्वार ठार