अश्या होत्या राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ…

किरण पिंगळे – आजचा दिवस हा हा स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सुन राजमाता जिजाऊंची जयंती…! स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि महापराक्रमी संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ…! ज्यांनी स्वराज्य उभारणीमध्ये बहुमूल्य साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या राजमाता जिजाऊ…! मुत्सद्दीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ…! माँ साहेब जिजाऊंबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच…! त्यांच्या महतीचे वर्णन करण्यास शद्बही अपुरे पडतात. त्यांचे नाव जरी मुखातुन निघाले तरी शरीर अगदी रोमाचून उठत…! ज्यांना आपण हिंदवी स्वराज्याचे दैवत मानतो त्या छत्रपतींना जन्म देणाऱ्या या माऊलीची जीवणगाथा देखील तितकीच खडतर आहे. त्यांचे चरित्र जाणुन घेताना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेग-वेगळ्या जिजाऊ उलगडताना दिसतात. जिजाऊंचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई ऊर्फ गिरीजाबाई त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होय. जिजाऊ लहानपणी पासुन चुणचुणीत, चणाक्ष, बुद्धीने तेज होत्या. एकदा शास्त्रीना त्यांनी विचारले, हा आमचा मुलुख जिंकुन घेण्यासाठी कुठल्या पुस्तकात उपाय सांगीतला आहे काय…! या प्रश्नाने शास्त्री जी चकित झाले नसते तर नवलच…!

जिजाऊंच्या पहिल्या शिक्षिका म्हणजे त्यांच्या आई म्हाळसाराणी तेजदार जिजाऊंना रामायण महाभारतातील शूर वीरांच्या स्वाभिमानी स्रियांच्या आणि नीती शिकविणाऱ्या ऋषी मुनींच्या गोष्टी सांगायच्या. म्हाळसाराणी या केवळ पुराणातच अडकून पडणाऱ्या नव्हत्या. तर त्यांनी आपल्या मराठे पूर्वजांनी विजयनगर आणि देवगिरीचे मोठे राज्य कसे उभारले त्यांच्या राज्यात रयत कशी सुखी होती हेही त्या समजावून सांगायच्या. जिजाऊंना मराठ्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर रयतेसाठी बळीच राज्य उभ करायचं स्वप्न त्या बोलुन दाखवायच्या…! रोज रात्री म्हाळसा आईच्या मांडीवर डोके ठेवून या कथा ऐकत ऐकत जिजाऊ झोपेच्या अधीन होत असत. जिजा शब्दाचा अर्थ जिजाऊंना सांगताना म्हाळसाराणी भावुक व्हायच्या. जिजा म्हणजे तुळजा भवानी…! जिजा म्हणजे जयविजय…! विजयगाथा रचणारी ती जिजा ती आदिमाया तुझ्या स्वरुपात माझ्या पोटी आली अस सांगुन जिजाऊंचा आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा त्या फुलवायच्या. राजे दत्तोजी हे जिजाऊंचे थोरले बंधु त्यांचीही जिजाऊं माँ साहेबांवर अपार माया. त्यांनीच जिजाऊंला घोड्यावर बसून रपेट मारायला शिकवलं. तलवार चालवायचे प्रशिक्षण दिलं. घोडदौडीत जिजाऊ तर आपल्या दत्तोजी राजे बंधूंनाही मागे टाकत असत.

राजे लखुजी यांनी जिजाला युद्ध शास्रातील शिक्षणाबरोबर राजकारण, न्यायनीती यांचे ही धडे दिले. राजा हा रयतेचा माय बाप असतो. हे जिजाऊंच्या मनावर ठसवायचे कारण असे की, शास्त्रीजींनी सांगितल्याप्रमाणे, जिजाऊंच्या पोटी शिवशंकर जन्माला येईल म्हणूनच राजे लखुजी जिजाऊंना नीतीचे मनापासुन धडे देत होते. रयतेच्या तक्रारींचे न्याय-निवडे करताना राजे लखुजी आपल्या कन्येला जिजाऊंना जवळ घेऊन बसत. न्याय निवड्याची प्रक्रिया आणि न्यायाचा निर्णय बाल जिजाऊ मोठ्या तन्मयतेने पहायच्या, ऐकायच्या राजे लखुजी जेव्हा वेळ मिळे तेव्हा जिजाऊंना जवळ घेऊन बसवून भारताच्या दुर्दशेची आणि मराठ्यातील बेकीची माहिती सांगायचे. आपल्या मराठ्यांच्या राज्यामध्ये सरदारांमध्ये एकी नहूती हे त्यामुळे हिंदुस्थानाला गुलामगिरीच जीण जगावं लागत असल्याने मोठ्या पोट तिडकीने लखुजीरावांनी आपल्या लाडक्या लेकीच्या कानात सांगितलं आणि त्यासाठी आपण एकी करुन रयतेच सहाय्य घेऊन आपली गुलामगिरी उखडून फेकून देऊन आपल सुखद राज्य स्वराज्य उभं केलं पाहिजे. हे भविष्यकालीन स्वप्न राजे लखुजींनी जिजाऊंच्या मनबुद्धि आत्म्यात पेरुन ठेवलं.

इ. स. १६०५ मध्ये जिजाबाईचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे झाला तेव्हा दोन तेजस्वी जीव एकत्र आले. पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. नंतर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं. पुढे जिजाबाईचा वडील लखुजी जाधव व त्यांचे पती शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाऊ आपल्या पतीशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी आपल्या माहेराशी संबंध तोडले. नंतर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं तेजस्वी पराक्रमी स्वराज्य स्थापणेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल म्हणून जिजाऊंनी भवानी मातेकडे पदर पसरला. पराक्रमी शहाजीराज्यांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही अशा शाहिंमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ही सत्ता असली तरीही तेथे मान-सन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही, यांचे जिजाऊंना भान होते. मुलाच्या जन्माआधी त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरवणार किती माता या समाजात असतील देव जाणे पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्याचा निष्पात केला, त्यांना नष्ट केलं, भवानी आईला जिजाऊंच हे मागण मान्य करण भागच होत. कारण जे दुःख जिजाऊंच होत तेच दुःख भवानी मातेच देखील होत, तिचा धर्म बुडत होता, तिची मंदिर पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. दोघींच्या गरजा दोघींची दुःख एक होती. लक्ष एक होत, स्वप्न एक होत. या स्वप्नांचा परिपाक म्हणुन जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली.

जिजाबाईना ८ अपत्य झाली त्यापैकी ६ मुली तर २ मुले होती. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करुन आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. परंतु विजापूरने ते उध्वस्त केले इ. स. १६४७ ते १६४९ या काळात शहाजी राज्यानी पुण्यात जांबर पाटलांकडून जागा विकत घेऊन लाल महाल नावाचा राजवाडा बांधला. जिजाऊ शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच झाला. जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज सवंगडांसोबत युद्ध कला शिकू लागले. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बाजी ही शेतकऱ्याची मुलं शिवाजीचे जिवलग मित्र झाले. शिवाजीसह सर्वजण जिजाऊंच्या आज्ञेनुसार वागत असत. १६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजीचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईशी लावून दिला. यावेळी शिवाजी विजापूर तर्फे बंगलोर येथे असल्यामुळे लग्नास येऊ शकले नाही, अशा रीतीने जिजाऊंनी निंबाळकरांच्या मुलीच्या सईबाई सासू बनल्या, तर वणजोगी निंबाळकरांची मुलगी दिपाबाई (मालोजींची पत्नी) या जिजाऊंच्या सासू होत्या. २५ जुलै १६४८ साली शहाजी याना कपटाने कैद केले हे काम वजीर मुस्तफा खान याचे होते. १६ मे १६४९ रोजी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजेंची सुटका केली.

कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापना करणे ही शिवरायांची धारण झाली ती जिजाऊंच्या या संस्कारामुळे शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनिर्वाह शिकविला. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिल. शस्रास्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईनं लक्ष ठेवल शहाजी राजांची कैद व सुटका अफजलखानाचे संकट आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना स्वतः जिजाऊ राज्य कारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. मूल आईकडून सदाचार व प्रेम घेतात तर वडिलांकडून कर्तृत्ववाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराज्यांच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली. शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना शिवजी राज्यांच्या आई व वडीलांची चोख जबाबदारी जिजाबाईनी मोठ्या कौशल्याने पेलली होती. शिवाजी राजे १४ वर्षाचे असताना शहाजी राज्यांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. राज्यांच्या शिक्षनाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात झालेल्या आणि स्वातंत्रात संपलेल्या सीतेचे हरण करणाऱ्या सीतेचे हरण करणाऱ्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता बकासुराधा वध करुन दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता आशा प्रत्येक गोष्टी त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते जे पारतंत्र्यात असताना त्यांना स्वतंत्र मिळवून देणे ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र ज्यांनी घडविला. शहाजीराजांना सदैव वाघिनीचे पाठबळ देऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आत्मविश्वास हरवून गुलामगिरी चाचपडत असलेल्या तमाम रयतेची माऊली बनून ज्यांनी आधार दिला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे. तोपर्यंत ज्यांची माता म्हणुन कीर्ती अबाधित राहील, अशा महामाऊली, महामाता, राजमाता, राजमाता, जिजाऊ साहेब अर्थातच जिजाबाई शहाजीराजे भोसले. जिजाऊंना आदर्शमाता, राजमाता म्हणून काल ही सन्मान होता, आजही आहे आणि अनंत काळ भविष्यातही असणार आहे याचे कारणही तसेच आहे. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनात ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी रात्रीचा-दिवस करणाऱ्या जिजामाता होत्या. शहाजीराजे बंगळुरात स्वारीवर असताना आपल्या मुलासाठी आईबरोबर वडिलांची ही जबाबदारी तितक्याच क्षमतेने पार पाडणाऱ्या आपल्या जिजाऊ होत्या. त्या नात्याला भावनांना कुरवाळत न बसता कर्तव्यपूर्तीसाठी खंबीरपणे आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन स्वराज्यातील रयतेचे रक्षण करणाऱ्या आपल्या जिजाऊ होत्या.

लेखन किरण पिंगळे-पत्रकार

Previous articleस्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या सेटवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी
Next articleग्रामपंचायत निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास कायदेशिर कारवाई करण्याचा सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचा इशारा