शेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त-डॉ.भगवानराव कापसे

सिताराम काळे,घोडेगाव- सामान्य शेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त असून शेतक-यांनी याचा अवलंब केला पाहिजे असे मत कृषीतज्ञ व आंबा अभ्यासक डॉ.भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आंबा बागायतदारांना लागवड ते निर्यात याबाबत जुन्नर येथे त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यु काळे, कृषी अधिकारी सुहास काळे, आंबा बागतदार रामभाऊ ढोले, नितीन काळे, प्रशांत काळे, मिलींद काळे, मंगेश हाडवळे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.कापसे म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या दोन दशकात केसर आंबा लागवड, मशागत तसेच निर्यातीच्या बाबतीत लोक जागृक झाले असून लागवडी वाढल्या आहेत. तसेच गेल्या तीन ते चार वर्षात आंबा पिकात अमुलाग्र बदल झाले असून शेतकरी या पिकाकडे वळू लागले आहेत. आंबा पिक गटशेतीमध्ये केल्यास प्रभावी ठरु शकते यासाठी शेतक-यांनी एकत्र येवून आंबा पिक घेतले पाहिजे.

भारत व इस्त्राईल यांच्या समन्वयाने फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबाद येथे केशर आंबा गुणवत्ता केंद्राची सुरवात केली आहे. या प्रकल्पात आधुनिक आंबाबाग उभारणी, घणन लागवड, योग्य खुंटांची निवड, छाटणी, विद्राव्य खतांचा वापर, जुन्या बागांचे नूतनीकरण यांचा अभ्यास केला जातो. यावर संशोधन करून आंबा लागवड ते निर्यात हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनचा डॉ.पंजाबराव देशमुख राज्यपुरस्कार मिळाला असल्याचे यावेळी डॉ.कापसे यांनी सांगितले.

Previous articleशिक्रापूर येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी पळवले
Next articleनारायणगावात एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणा-या दोन चोरट्यांना पोलीसांनी रंगेहात पकडले