नववर्षाच्या स्वागतासाठी एटीडीसीची निवासे / रिसॉर्ट सज्ज

पुणे-संपुर्ण जग नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना पुनश्च: कोरोना व्हायरस चा नवा विषाणु दरवाजे ठोठावत आहे. अशा प्रसंगास आपण सर्वजण आणि शासन धीराने तोंड देत आहोत. सदरच्या बाबींचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी पर्यटनाची ओढ सर्वांना निसर्गाकडे खेचुन नेत आहे.

दरम्यान, सदरच्या नव्या व्हायरस मुळे जिल्हाधिकारी आणि शासनाने रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. सदरच्या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट खुली असुन पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत.

नव वर्षाच्या स्वागताची आणि नाताळ सण साजरा करण्याची जय़यत तयारी महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये उत्साहाने करण्यात आली आहे. पर्यटक निवासांमध्ये “सांताक्लॉज’” चॉकलेट बरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनायांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.
आपली पर्यटक निवासे ही महामंडळाचे कर्मचारी “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून टाळेबंदीच्या कठीण काळातही काम करुन परिसर आणि खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवल्या आहेत. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे निर्जंतुकिरण करण्यात आल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे.

आसपासचा परिसर स्वच्छ ठेवत आहोत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी करणे व पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात होते. महामंडळाची आणि पर्यटकांचीही आतुरता आता संपली असुन सर्व पर्यटक निवासे 100 टक्के फुल झाली आहेत. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत.
पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोनावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वर कडे पर्यटकांचा ओढा असुन शिवशंकराच्या सानिध्यात महामंडळाच्या भिमाशंकर पर्यटक निवासातही पर्यटक गर्दी करत आहेत.

तथापि, मा. जिल्हाधिकारीसो आणि शासन यांच्या आदेशाचे आणि सर्व सुरक्षात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करुन महामंडळ नाताळ आणि नववर्षाच्या आगमनाचा आनंद पर्यटकांना देणार आहे. रात्री 11 नंतर संचारबंदी असल्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेवुन आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचा महामंडळाचा मानस आहे. कोरोना आजाराविरुध्द सर्व प्रकारची खबरदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन घेण्यात येत आहे. तथापि, पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवुन पर्यटनाचा, नव वर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आले आहे.

Previous articleमाहिती सेवा समितीच्या वतीने गणेश गायकवाड यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
Next articleगौरव ‘अटल’, ‘भारतरत्न’ कर्मयोगीचा !