गोहे बु. येथे खास आदिवासींसाठी निसर्गोपचार रूग्णालय सुरु

सिताराम काळे, घोडेगाव

गोहे बु. (ता.आंबेगाव) येथे खास आदिवासींसाठी निसर्गोपचार रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे मोफत उपचारांबरोबरच आदिवासी तरूणांसाठी निसर्गाेपचार पध्दतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेणा-या विदयार्थ्याला दरमहा पाच हजार विदयावेतन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी सांगितले.

राष्ट्रीय निसर्गोपचार आदिवासी प्रकल्पाची माहिती नागरिकांना माहित व्हावी यासाठी गोहे बु. येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी बोलत होत्या. यावेळी जेष्ठ मानववंश शास्त्रज्ञ प्रा. आर. के. मुटाटकर, राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. मोहन गुप्ते, डॉ. प्रशांत कुटे आदि उपस्थित होते.

निसर्गोपचार रूग्णालय इम्यून डेफिशिअन्सी बांधीतांसाठी देखील कार्य करणार आहे. तसेच रूग्णांना निसर्गोपचार, योग व आहार यांचे समुपदेशन मोफत दिले जाणार आहे. एक वर्षाच्या निसर्गोपचार पध्दतीचे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी विदयार्थ्यांना विदयावेतन देण्यात येणार आहे. केवळ त्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी प्रकल्प मदत करणार नाही तर त्यांना निसर्गोपचार क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळवून देणार आहे. या आदिवासी प्रकल्पाच्या अधिक माहिती साठी निसर्गोपचार रूग्णालय गोहे बु. येथे डॉ. शिवकेश यांच्याशी ८७३९०१८१२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी केले.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते वाडा कडूस गटात विविध कामांचे भूमिपूजन
Next articleआंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर