सायबेजखुशबू संस्थेच्यावतीने खेड तालुक्यातील मोरोशी येथे महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात

राजगुरुनगर-खेड तालुक्यातील मोरोशी येथे सायबेजखुशबू संस्थेने आयोजित केलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन खेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी अनीता ससाणे यांच्या हस्ते झाले. मोरोशी व आसपासच्या गावातील बचत गटांच्या क्रियाशील महिलांसाठी सायबेजखुशबू संस्थेने मोरोशी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील सभागृहात कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे.

या प्रशिक्षण वर्गात सहभागी महिलांना मेणबत्ती व अगरबत्ती बनविण्याचे कौशल्य शिकविले जाणार आहे. प्रशिक्षित महिलांना स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करायचा याचे देखील मार्गदर्शन केले जाईल.हे प्रशिक्षण वर्ग आज गुरुवार, दि १० डिसेंबर २०२० सकाळी १० ते शनिवार दि. १२ डिसेंबर २०२० सायंकाळी ५ या कालावधीत पार पडणार आहे.या कार्यशाळेत ३५ महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रदीप दळवे, कार्यकारी अधिकारी सायबेजखुशबू यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. सौ जयश्रीताई नांगरे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका हेमा माने मॅडमनी कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय व प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. सौ ससाणे मॅडमने उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांनी विविध योजनांची माहिती देखील दिली, खेड पंचायत समितीच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असेही त्या म्हणाल्या.

या प्रसंगी मोरोशी गावाच्या सरपंच सौ जयश्रीताई नांगरे, उपसरपंच विद्याताई नांगरे, पोलिस पाटील रोहिदास नांगरे, ग्रामसेवक श्री उमेश खैरनार, व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे व त्यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या महत्वाच्या उद्देशासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगर पासून ४२ किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत मोरोशी नावचे एक छोटेखानी गाव आहे. या गावापासून भीमाशंकर साधारण २० किमी अंतरावर आहे. गावातील लोक मुख्यतः भातशेतीवर अवलंबून आहेत. भातशेतीचा काळ संपल्यावर येथील तरुण रोजगारासाठी चाकण, पुणे, मुंबई शहराकडे धाव घेतात. गावातील अनेक समस्यांपैकी रोजगार ही महत्वाची समस्या आहे. सायबेजखुशबू च्या पुढाकाराने कस्तुरबा संस्था देत असलेले हे प्रशिक्षण येथील महिलांसाठी नक्कीच आशेचा किरण ठरेल.

अधिक महितीसाठी संपर्क करा : प्रदीप 9689894848

Previous articleगारगोटवाडीच्या उपसरपंचपदी रोहिणीताई काळोखे यांची बिनविरोध निवड
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते वाडा कडूस गटात विविध कामांचे भूमिपूजन