गावडेवाडी येथे शेतातील बटाट्याची चोरी

Ad 1

प्रमोद दांगट निरगुडसर

आंबेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून शेतकर्‍यांच्या विविध पिकांची चोरी होत असून गावडेवाडी येथील शेतकरी रघुनाथ सिताराम गावडे यांच्या शेतातील बटाटा पीक उकरून अज्ञात चोरट्यानी सहा पिशवी बटाटा चोरून नेला असल्याची घटना घडली आहे. याबाबत शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

अतिवृष्टी, लॉकडाउन, शेतीपिकाना मिळत नसलेला बाजारभाव यासारख्या अनेक गोष्टींची आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातही शेतकरी विविध पिके घेत आपल्या आर्थिक गणित सुरळीत करत असताना त्याने पिकविलेल्या शेती पिकांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला चांगला बाजार भाव मिळाला होता त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी झाली होती त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा बटाटा पिकाकडे वळवला आहे.आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील रघुनाथ सिताराम गावडे यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रात घेतलेल्या बटाटा पिकातील सहा पिशवी बटाटा अज्ञात चोरट्यांनी उकरून चोरून नेला आहे.आजच्या बाजारभाव नुसार बटाट्याला ४० रुपये एक किलो असा भाव असून गावडे यांचे अंदाजे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून बटाटा चोरीच्या घटना घडू लागल्याने शेतकऱ्यांना आता बटाटा पिकाचे रात्रीच्या वेळी राखण करावे लागते की काय अशी भीती वाटू लागली आहे.