मराठी पत्रकार परिषदेची दैदिप्यमान परंपरा… विभागीय सचिव बापुसाहेब गोरे

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील आठ हजार पत्रकारांना आपलेपणा जपणारी ८१ वर्षाची पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा उद्या ८२ वा वर्धापनदिन होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त प्रत्येक तालुका व जिल्हा संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात असून सुमारे पाच हजार पत्रकारांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक काकासाहेब लिमये यांनी सुरु केलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व विश्वस्त किरण नाईक, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद यशस्वी वाटचाल करीत आहे. तालुका पत्रकार संघाचा मेळावा, राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशन, जिल्हा मेळावे, तालुका बैठका, आरोग्य शिबीराचे आयोजन, ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान अशा विविध माध्यमातून पत्रकारांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याचे काम परिषदेचे पदाधिकारी मोठ्या जोमाने करताना दिसत आहेत.

संघटना स्थापन करुन संघटनेचे पदे घेऊन मिरवणारे असंख्य संघटनांचे पदाधिकारी आहेत, मात्र पत्रकारांच्या भल्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ट पत्रकारांना पेन्शन, छोट्या व जिल्हा वर्तमानपत्रांना जाहिरात दर वाढवून घेणे, वर्तमानपत्रांची थकीत शासकीय बिले मिळवून देणे, यासारख्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने वेळोवेळी आंदोलने केली. महाराष्ट्रातील विविध १८ पत्रकार संघटनांना बरोबर घेऊन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना करुन पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करुन घेण्यात परिषदेचा मोठा पुढाकार आहे. आतापर्यंतचे माजी आजी मुख्यमंत्री व विविध खात्याचे मंत्री यांच्याकडे सततचा पाठपुरावा, नागपूर येथील बेमुदत उपोषण, राज्यभर घंटानाद आंदोलन, पनवेल ते मंत्रालय पत्रकारांच्या चार चाकी गाड्यांची रॅली आंदोलन, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध, राज्यातील आमदारांच्या सह्यांचे आंदोलन अशी विविध आंदोलने मराठी पत्रकार परिषदेने केली त्याचे फलित पत्रकारांच्या अनेक मागण्या मंजूर करुन घेण्यात परिषदेला यश मिळाले आहे.
पत्रकारांचे काही प्रश्न शिल्लक असून त्यासाठीही मराठी पत्रकार परिषद प्रयत्नशील असल्याचे दिसते.

कोरोनाच्या जीवघेण्या आजाराच्या काळात मराठी पत्रकार परिषदेने मोठा पुढाकार घेऊन गरजू पत्रकारांना अन्नधान्य , जीवनावश्यक वस्तू व कोरोनावर उपचार म्हणून सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तुंचे वाटप घरपोच केले त्यामुळे अनेक पत्रकारांना कोरोनाची झळ कमी प्रमाणात बसली. पत्रकारिता करताना कोरोनाने अनेक पत्रकारांचे जीव घेतले अशावेळी मराठी पत्रकार परिषद त्यांच्या कुटुंबाच्या मदतीला धावून गेली व मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तर्फे लाखो रुपयांची मदत मिळवून दिली. राज्यातील विविध जिल्ह्यातील १२०० पत्रकारांना आरोग्य वैद्यकीय मदत मिळवून दिली.

पत्रकारितेच्या नवीन वाटांचा मराठी पत्रकार परिषद नेहमीच आढावा घेत असते. सध्या सोशल मिडिया पत्रकारिता खूप वेगाने पुढे आली आहे. या सोशल मीडिया पत्रकारितामध्ये राज्यातील मोठ – मोठे दैनिके, नॅशनल चॅनेल व त्यांचे संपादक व पत्रकार काम करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या ही अनेक अडचणी समोर आल्या असून त्यांच्या काही मागण्या आहेत व काम करणारे पत्रकार आहेत, हे ओळखुन मराठी पत्रकार परिषदेने राज्यस्तरीय सोशल मीडियाची स्थापना केली असून लवकरच त्याची राज्यकार्यकारिणी नियुक्त केली जाणार आहे. सोशल मीडिया पत्रकारांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडविले जाणार आहेत.

लोकशाही मार्गाने व परिषदेच्या घटनेनुसार मार्गक्रमण करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रातील पत्रकार एक परिवार म्हणून पाहत असून मोठ्या आशा लावून आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,विश्वस्त मा किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी उपाध्यक्ष, महिला प्रतिनिधी, विभागीय सचिव ३६ जिल्हे व ३६५ तालुक्यातील पदाधिकारी पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत.

पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या व सतत कार्यरत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघ परिषेदेला अनुसरुन विधायक उपक्रम घेत आहेत.

Previous articleपदवीधर युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन शेतकर्‍यांपुढे ठेवला आदर्श
Next articleमराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिना निमित्त आरोग्य शिबीर संपन्न