वडिलांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता अस्थी व रक्षा माती मिसळून केलं  वृक्षारोपण

शिंदवणेचे माजी सरपंच अण्णासाहेब महाडीक कुटुंबाचा आगळा वेगळा आदर्श

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णासाहेब महाडिक व गणेश महाडिक यांचे वडील तसेच हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशालीताई गणेश महाडिक यांचे सासरे भाऊसाहेब आनंदा महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाडिक कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन भाऊसाहेब महाडिक यांच्या अस्थी नदीत विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला.अस्थी नदीत विसर्जन केल्याने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते अस्थी बरोबर रक्षा नदीत विसर्जन केल्यानंतर रक्षा पाण्याच्या तळाला जाऊन पाणी जमिनीत मुरण्यासाठी अडथळा निर्माण होतो यासारख्या अनेक कारणांमुळे नदी प्रदूषित होते.

भाऊसाहेब महाडिक हे सांप्रदायिक होते त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक धार्मिक कार्य केले श्री संत चांगावटेश्वर पालखी मध्ये शिंदवणे गावच्या दिंडीचे ते प्रमुख होते. त्यांनी गेली बारा वर्षं पालखीमध्ये पंढरपूरपर्यंत पायी वारी केली. या वारीमध्ये त्यांनी स्वखर्चाने वारीतील वारकऱ्यांना अन्नदान व औषध उपचार केले. त्यांच्या अचानक जाण्याने निश्चितच महाडिक कुटुंबाचा आधार गेला असे असले तरी वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाडिक कुटुंबाने दशक्रिया विधीच्या वेळी शिंदवणे दशक्रिया घाट परिसरामध्ये सात फुटाच्या आंब्याच्या वृक्षांची लागवड करताना वडिलांच्या अस्थी व रक्षा एकत्र करून वृक्षारोपण केले.

 

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर ,हवेली खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुलाब चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, उद्योजक एल बी कुंजीर , तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन , पंचायत समिती उपसभापती हेमलता बडेकर यांच्यासह हवेली, पुरंदर, दौंड तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्यातील मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला उपस्थित होते.

दशक्रिया विधीच्या वेळी हरी भक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे प्रवचन झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर श्रद्धांजली अर्पण केली तसेच खासदार अमोल कोल्हे यांनीही पाठवलेला शोक संदेश वाचून दाखवण्यात आला.
आण्णासाहेब महाडिक परिवाराने वडिलांच्या अस्थी विसर्जन न करता अस्थी व रक्षा मातीत मिसळून वृक्षारोपण केलेल्या आदर्शाचे पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Previous articleमहाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – आढळराव पाटील
Next articleकौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुण्यात बैठक