महाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – आढळराव पाटील

सिताराम काळे, घोडेगाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचे उत्तम निर्णय घेत आहे. विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे दोन्हीही उमेदवार पहिल्या पसंतीचे मतदान मिळवून भरघोस मतांनी विजयी होतील अशी खात्री शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघाच्यावतीने महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड व प्रा. जयवंत दिनकर आसगावकर यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आढळराव पाटील म्हणाले की, विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच संपन्न होत असून शिवसेनेच्या वतीने तालुकानिहाय व गावनिहाय मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी गावोगावी असलेल्या मतदारांशी संपर्क साधून महाविकास आघाडीची कामे व उमेदवारांची माहिती पोहचवून जास्तीत जास्त मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळवून देण्यासाठी जोमाने कामाला लागावे. राज्य व देश कठीण प्रसंगातून जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे व आरोग्यासह सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेऊन लोकांची मने जिंकली आहेत. पदवीधर व शिक्षक वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या पाठीशी असून त्यासाठी शासन दरबारी योग्य भूमिका मांडणाऱ्या महाविकास आघाडीच्या दोन्ही नेत्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके म्हणाले की, शिवसेना आदेशावर चालणार पक्ष आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे शिवसेना व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उमेदवार अरुण लाड यांचे बंधू हृदयनाथ लाड म्हणाले की, या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी वेळेअभावी पोहोचण्यास उशीर झाला. माजी खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतलेला निर्णय पाहता महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार चांगल्या मताधिक्याने निवडून येथील अशी खात्री हृदयनाथ लाड यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, ज्येष्ठ नेते प्रा. राजाराम बाणखेले, शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, गणेश जामदार, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, अनिल काशिद, पोपट शेलार, रवींद्र करंजखेले, युवासेना विस्तारक सचिन बांगर, प्रवीण थोरात, विजय आढारी, शिवाजी राजगुरू, उपसभापती ज्योती अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. अरुण गिरे यांनी सूत्र संचालन तर सुरेश भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous articleमहासूर्योदय मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन
Next articleवडिलांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता अस्थी व रक्षा माती मिसळून केलं  वृक्षारोपण