अखेर चाकण – तळेगाव रस्त्याला मुहूर्त “२४ कि.मी ” चे होणार काँक्रीटीकरण…आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश

बाबाजी पवळे,तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 548D साठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने एकूण 24 किलोमीटर रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण अंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता कुठलेही संपादन न करता तळेगाव ते चाकण असे २४ किलोमीटर अंतर १२ मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्चाची मंजुरी मिळाली आहे.

ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही मंजुरी दिली आहे. तळेगाव-चाकण या परिसरात औद्योगिक क्षेत्र असून नागरीकरणही वाढत आहे. हा रस्ता औद्योगिक वसाहतीचा मुख्य रस्ता आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहनचालक, कामगार, स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

तळेगाव-चाकण रस्ता काँक्रिटीकरण झाल्यास वाहतूक कोंडी समस्या कमी होईल. भविष्यातील विचार करता या भागातील विकासाला अधिक चालना मिळण्यास मदत होईल, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
या कामासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केल्याबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोघांचे आभार मानले.

Previous articleशासकीय जागेतील झाडे तोडल्याने घोडेगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Next articleलग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमांत ५० पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्यास कारवाई करण्याचा आंबेगाव पोलीसांचा इशारा