कंपनीकडे खंडणी मागणाऱ्या माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षासह ५ जणांच्या महाळुगे पोलीसांनी मुसक्या आवळल्या

Ad 1

चाकण-आमच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीत नेमल्याचे दाखवून त्याच्या पगाराचे २२ हजार रुपये दरमहा हप्ता द्या, अशी खंडणीची मागणी करणा-या एका कामगार संघटनेच्या अध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

वेदांत एंटरप्रायजेस नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय शंकर कौदरे (वय ३९, रा. खरोशी, ता. खेड), प्रदीप रामचंदनरा सोनवणे (वय ३२, रा. खरोशी, ता. खेड), गणेश दशरथ सोनवणे (वय ३३, रा. कुरुळी, ता. खेड), स्वप्नील अजिनाथ पवार (वय २९, रा. एकतानगर, चाकण), धोंडिबा उर्फ हनुमंत विनायक वडजे (वय ३२, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कुरुळी येथील एका कंपनीच्या अधिका-यांना कंपनी चालवायची असेल तर आरोपींच्या वेदांत एंटरप्रायजेस नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीत नेमल्याचे दाखवून प्रत्यक्ष त्याला कामावर न घेता त्याचा पगार आणि इतर चार्जेस असा एकूण २२ हजार रुपये हप्ता आम्हाला द्या. नाहीतर तुमच्याकडे बघून घेईन. तुमची विकेट काढीन, अशी धमकी दिली.

याबाबत म्हाळुंगे चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत पोलिसांनी खंडणी स्वीकारण्यासाठी आरोपी कंपनीत येण्याची वेळ गाठून कंपनीत सापळा लावला. आरोपी कंपनीत खंडणीची रक्कम नेण्यासाठी येताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश , मा . अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , मा पोलीस उपआयुक्त श्री मंचक इप्पर , सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रामचंद्र जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस उप निरीक्षक राहूल भदाने , पो.हवा राजेंद्र कोनेकरी, पोलीस नाईक संपत मुळे, पोलीस नाईक प्रशांत वहील, पोलीस नाईक अमोल बोराटे, पो.कॉ शाहनवाज मुलानी, अजय गायकवाड, पवन वाजे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर हे करीत आहेत,