भिमाशंकरला जाणाऱ्या भाविकांची खड्ड्यांनी केली हाडे खिळखिळी

सिताराम काळे,घोडेगाव

श्री क्षेत्र भीमाशंकरला जायचंय ? नीट जा आणि निट या, गाडी हळूच चालवा, खड्डयांवर लक्ष ठेवा, खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होईल काळजी घ्या, असा फलक मंचर पासुन श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाताना लावल्यास चुकीचे ठरणार नाही, अशी प्रतिक्रीया या रस्त्याने जाणारे-येणारे भाविक, ग्रामस्थ देत आहेत.

बारा ज्योर्तिलींगापैकी सहावे ज्योर्तिलींग भीमाशंकर आहे. या पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी दिवाळीच्या पाडव्यानंतर आता भाविक येऊ लागले आहेत. मंचर पासुन श्री क्षेत्र भीमाशंकर सुमारे ५५ किमी अंतर आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची संख्या पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठेकेदारांना अभय दिले की काय? हा प्रश्न निर्माण होतो आहे. या रस्त्यावर या विभागाने कोटयावधी रूपयांचा खर्च केलेला आहे. मागील वर्षी या रस्त्यांवर काही ठिकाणी काम झाले आणि खड्डे भरण्यात आले होते. परंतु हे खड्डे भरताना व रस्त्याचे काम करताना या विभागातील एकही अधिकारी, कर्मचारी यावेळी हजर असलेला दिसला नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम राम भरोसे चालले असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकरला जाताना लहान मोठे खड्डे चुकवत जावे लागत आहे. या कसरतीच्या प्रवासात खड्डे चुकवीत असताना दुचाकीस्वार अनेक वेळा घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्या दुचाकीवर महिला, लहान मुले असल्यास त्यांना त्याचा परिणाम दुखापतीपर्यंत भोगावा लागला आहे. तर चारचाकी वाहन उडया मारत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आतील प्रवाशांना आणि चालकांना आपला वेग नियंत्रण न ठेवल्यास वाहनाचे नुकसान आणि आत बसलेल्या प्रवाशांची हाडे खिळखिळी होण्याचा त्रास या प्रवासात होत आहे. यासाठी या रस्ता दुरूस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगल्या पध्दतीने करून घ्यावीत, अशी मागणी प्रवासी, भाविक व स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Previous articleडेंग्यूला हद्दपार करण्यासाठी घोडेगाव ग्रामपंचायतची जनजागृती
Next articleदहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना शासकीय कार्यालयांत वाहिली श्रद्धांजली