डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी घोडेगाव ग्रामपंचायतची जनजागृती

सिताराम काळे, घोडेगाव

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनसामान्यांनी धास्ती घेतली असून, दुसरीकडे वातारवरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. कोरोनाच्या लक्षणाशी साम्य असल्याने सर्दी-खोकला आला की प्रत्येक जण धास्ती घेऊ लागला आहे. यातच घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे डेंग्यु सदृश तापाची साथ सुरू असल्याने, ग्रामस्थांनी कशी काळजी घ्यावी यासाठी घोडेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व सदस्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहे.

वातावरणात गारठा जाणवू लागल्याने दिवसा तप्त ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या अनुभवायला मिळते आहे.वातावरणातील गारव्यांमुळे लागण होण्याची शक्यता निर्माण होते. साथरोगांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून येतात. तर काही रूग्णांमध्ये घसा व अंगदुखी, डोकेदुखी व मळमळ उलटीची तक्रार असते. कोरोनाची लागण झाल्यावर चव न लागणे किंवा गंध लक्षात न येण्यासह श्वसनास त्रास होणे. अंग कसकसणे, अंगदुखी व डोकेदुखी, किमान एक दिवसासाठी हा होईना ताप येतो, खोकला थांबत नाही, नाकही सातत्याने गळते यासाठी शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक, शक्यतो सार्वजनिक ठिकाणी संपर्क टाळावा. नियमित हात स्वच्छ धुवावेत, आवश्यकता वाटल्यास सॅनिटायझरचा वापर करावा. नाक, डोळे, तोंडाला सारखा हात लावू नये.

तर डेंगी झाला असल्यास सांधेदुखी, चेह-यावर लालसर रॅशेस येणे, ताप, काही वेळा डोळे दुखतात. रात्रीच्या वेळी तापाने अंग फणफणते, काही वेळा हाडे दुखतात. यासाठी घरात व सभोवतालच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी. डेंगीच्या विशिष्ट प्रकारच्या डासांचा वावर आपल्या सभोवताली नसल्याची खातरजमा करावी. पाणी उघडया भांडयात साठवू नये, फ्रिजच्या भांडयात पाणी साठू देऊ नये. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने या आजारांतील नेमका फरक लक्षात घ्यावा. त्रास जास्त होत असेल तर अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे अवाहन ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व सदस्य यांनी केले आहे.

Previous articleलस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं
Next articleडेंग्यूला हद्दपार करण्यासाठी घोडेगाव ग्रामपंचायतची जनजागृती