गरीबीवर मात करून जिद्दीच्या जोरावर अक्षय ढाकणे झाले तहसीलदार

शेलपिंपळगाव : घरची परिस्थिती एकदम हलाखीची. वडील एका छोट्या कंपनीमध्ये कामगार म्हणून कामावर तर आई गृहिणी. वडिलांच्या पगारावर महिनाभराचा घरखर्चही भागत नव्हता. अशावेळी काटकसर करून दिवस काढावे लागत होते. त्याचवेळी मनात निश्चय केला; आपण ही हलाखीची परिस्थिती बदलायची. यावर पर्याय म्हणून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. अखेर जिद्दीच्या जोरावर सामान्य कुटुंबातील तरुणाने मामलेदार (तहसीलदार) पद मिळवले.

भोसरी येथील अक्षय अशोक ढाकणे यांची ही परीकथा आहे. अक्षयचे प्राथमिक शिक्षण भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. २००३ साली इयत्ता चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेत अक्षय ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत झळकला. तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत अकरावा आला. त्यानंतर निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एनटीएस परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत त्याने स्थान पटकावले व शिष्यवृत्ती प्राप्त केली. दहावी बोर्डाच्या परीक्षेत मागास विद्यार्थ्यामधून त्याने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अभियांत्रिकी शिक्षण सीओईपी मधून पूर्ण करताना इलेक्ट्रिकल या शाखेतून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकही प्राप्त केले आहे. अक्षयचा शैक्षणिक आलेख सतत उंचावत राहिला असला तरीसुद्धा काही वेळा त्याने अपयशही पचवले आहे.

घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी त्याने पदवीचे शिक्षण घेत असताना विविध क्लासेसचे ११ वी/१२ वी चे सराव पेपर तपासण्याचे कामही केले. अभियांत्रिकीची पदवी घेत असताना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्याची एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. पदवी मिळविल्यानंतर त्याने नोकरी जॉईन केली. परंतु प्रथमपासूनच त्याला प्रशासकीय सेवेतील नोकरी खुणावत होती. परिणामी चांगल्या पगाराची नोकरी सोडून अक्षयने पूर्णवेळ राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अगदी दुसऱ्याच प्रयत्नात त्याने एमपीएससीमधून तहसीलदारपद प्राप्त केले. अक्षयच्या यशाबद्दल आमदार दिलीप मोहिते – पाटील, आमदार महेश लांडगे, खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

” प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना गोरगरीब जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवणे व त्याची अंमलबजावणी करणे व सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडेल असे निर्णय घेणे हे माझे उद्दिष्ट आहे. मी माझ्या यशाचे श्रेय आई – वडिलांना, सर्व शिक्षकांना, मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देतो. केंद्रीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी प्रचंड अभ्यास करणे सुरूच ठेवणार आहे.
– अक्षय ढाकणे,

Previous articleअँड. प्रफुल्ल गाढवे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा