निरगुडसर येथे विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारांची चोरी ; शेतकऱ्यांचे दीड लाखाचे नुकसान

प्रमोद दांगट,निरगुडसर

निरगुडसर बेटवस्ती  (ता.आंबेगाव ) येथे सात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना (दि. 22) रोजी रात्री घडली आहे या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे तर या करणाऱ्या चोरट्यांवर त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोरोना काळात शेतकरी आपल्या शेती पिके जगवून त्यांना योग्य बाजार भाव मिळेल असे नियोजन करत असताना तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा चोरणे ,ऊस जळणे,असे असे प्रकार घडत असून आता शेतकऱ्यांच्या शेती पिकाला पाणी देणाऱ्या विद्युत मोटारीच्या तारा ही चोरटे चोरी करू लागले आहेत. निरगुडसर येथील घोड नदीच्या बाजूला असलेल्या कुंडलिक महादू टाव्हरे, जनार्धन रेणू टाव्हरे, महादू सहादू टाव्हरे,तुकाराम रामचंद्र टाव्हरे, तुकाराम शंकर टाव्हरे, गेनभाऊ सावळेराम टाव्हरे,सावकार तुकाराम टाव्हरे या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या आत मधील सर्व तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. यामध्ये या शेतकऱ्यांची सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. निरगुडसर बेटवस्ती ,वळसे मळा व आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला घोड नदीतून पाणी असल्याने विद्युत मोटारी या घोड नदीपात्राच्या बाजूला आहेत.या विद्युत मोटारींच्या केबल, तांब्याच्या तारा ,चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत असून पोलिस प्रशासनाने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी

निरगुडसर परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने येथे बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे.शेतीपिकांना पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट असल्याने अनेकदा शेतकरी बिबट्याच्या भीतीपोटी विद्युत मोटर चालू करण्यासाठी किंवा शेतात जाण्यासाठी टाळाटाळ करत आहे. याचाच फायदा घेऊन चोरटे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीतील तारा चोरून नेत आहे. त्यामुळे महावितरण शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा द्यावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी गावचे उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, रामकृष्ण पतसंस्थेचे व्हा. चेयरमन नवनाथ टाव्हरे यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

Previous articleपोंदेंवाडीत ज्वारीच्या शेतात जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले, एकजण फरार
Next articleनारोडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी स्वप्निल पिंगळे यांची बिनविरोध निवड