खळबळजनक -सापाला मारून जाळल्याने तिघांवर गुन्हा दाखल

बाबाजी पवळे,शिक्रापूर – सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे घोणस जातीचा साप ठार मारून त्याला जाळले असल्याची घटना घडली होती.याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यात सापाची हत्या केल्यामुळे गुन्हे दाखल झाल्याची पहिलीच घटना घडली. सापाला ठार मारल्यावर वनविभाकडून कारवाई होत असल्याने तालुक्यात खळबळ पसरली असून नागरिकांनी देखील या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे.

बबन विठोबा लंघे, दिलीप सदाशिव लंघे, कैलास किसन गावडे (तिघे रा. लंघेमळा सविंदणे ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सविंदणे येथील लंघेमळा येथे तिघांनी घोणस जातीच्या सापाची हत्या करून त्याला जाळून टाकल्याबाबचे फोटोसह पुरावे व माहिती महाराष्ट्र वन्य पशु पक्षी संरक्षण समितीचे सर्पमित्र यांना मिळाली होती. त्यांनतर सर्पमित्रांनी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे लेखी तक्रार करून साप मारणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असता शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या आदेशानुसार वनपाल चारुशिला काटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यावेळी सापाला मारून जाळले असल्याचे लक्षात आले. त्यानुसार वनविभागाने सापाची हत्या करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला असता बबन विठोबा लंघे, दिलीप सदाशिव लंघे, कैलास किसन गावडे (तिघे रा. लंघेमळा सविंदणे ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम १९७२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चारुशिला काटे करत आहे.

Previous articleचोरून वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मंचर पोलीसांची कारवाई
Next articleदारूविक्री करणाऱ्या टोळीवर वालचंदनगर पोलिसांकडून मोठी कारवाई! तीन महिन्यासाठी केले तडीपार…