वेगरे’च्या सरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष ….ग्रामपंचायत सदस्य गेले देवदर्शनाला

पौड- मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यातील वेगरे गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार असून ही निवड सदस्यांमधून होणार आहे सरपंच निवडीबाबत ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा वेगरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार (दि.१०) रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इच्छुक प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु वेगरे गावचे माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांच्याकडे स्पष्ट बहुमत असून ते सात पैकी चार ग्रामपंचायत सदस्य घेऊन देवदर्शनाला गेले आहे.


याबाबत मरगळे यांनी सोशल मीडियावर एकत्रित फोटो व्हायरल करून माहिती दिली आहे. या चार सदस्यांमध्ये भाऊसाहेब मरगळे यांचे मेहुणे, बहिण यांचा सहभाग असून यापैकी अन्य कोणाला ते संधी नेमकी कोणाला देणार याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.

वेगरे गावच्या सरपंच यापैकी एक होणार परंतु सध्यातरी किंगमेकर अशी भूमिका भाऊसाहेब मरगळे बजावणार असून मरगळे ठरवतील तीच व्यक्ती सरपंचपदी विराजमान होईल असे तरी सध्याचे चित्र आहे.

भाऊसाहेब मरगळे यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आता जरी सोबत चार सदस्य असले तरी माझ्यासोबत सहा सदस्य असून आमच्यामध्ये एकमत आहे सर्वानुमते मला नाव सुचवण्यास सदस्यांनी सांगितले असून मी जे नाव सुचविल त्याला त्यांचे सर्वांचे अनुमोदन आहे .त्यानुसार मी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सकाळी ११ वाजता बंद लिफाप्यात उमेदवारी अर्ज देणार आहे.

Previous articleराजगुरूनगर शहरातील जिजाऊंच्या लेकींनी चिमुरड्या मावळ्यांसाठी गॅलरीत बनवले किल्ले
Next articleशेती करतोय म्हणून अपराधीपणा वाटून घेऊ नका-राजाभाऊ कदम