हवेली पंचायत समितीच्या उपसभापती हेमलता बडेकर यांची निवड

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली  पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीच्या हेमलता बाळासाहेब बडेकर यांची बहुमताने निवड़ झाली आहे. हवेली पंचायत समितीच्या हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत हेमलता बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा सोळा विरुध्द तीन अशा मोठ्या फरकाने पराभाव केला.

हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बडेकर यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघाऱी घेण्याच्या निर्धारीत वेळेत दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने, मतदान घेण्यात आले. यात हेमलता बडेकर यांना सोळा तर अनिरुध्द यादव यांना तीन मते मिळाली. यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

हवेली पंचायत समितीचे मावळते उपसभापती सनी काळभोर यांनी एक महिन्यापुर्वी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपसभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली.
याप्रसंगी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, रा.कॉ. तालुका अध्यक्ष दिलिप वाल्हेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, सरपंच आण्णासाहेब महाडिक, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बडेकर, तसेच हवेली ता.पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षश्रेष्ठीनी दिलेल्या संधीच सोन करण्याचा प्रयत्न करणार तसेच शासकीय योजनेचा लाभ तळागाळातील सामान्य माणसाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असा विश्वास नुतन उपसभापती हेमलता बडेकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.