उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब कांचन

अमोल भोसले, उरुळी कांचन — प्रतिनिधी

पूर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन मोठी बाजारपेठ असणारी ग्रामपंचायत येथील राजकारणाचा अद्यापही कोणालाही अंदाज आलेला नाही. येथील ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीने अचानक वेगळे वळण घेत झालेल्या गुप्तमतदानात ९ विरुद्ध ४ अशा मताच्या फरकाने भाऊसाहेब कांचन विजयी झाले. तर सूचकाने मतदान न करण्याचा प्रकार घडल्याने हा सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या २०१५ ते २०२० या पंचवार्षिक निवडणुकीत एकाच पॅनेल मधून निवडून आलेल्या ७ , दुसऱ्या पॅनेलमधून निवडून आलेल्या ५ व अपक्ष ५ अशा १७ सदस्यांनी सत्तेचा सारीपाट वाटून घेण्याचा चांगला पायंडा संगनमताने राबविला पण यातही एकमेकाविरुद्धचा गैरविश्वास दाखविणे शेवटपर्यंत काही थांबले नाही.आजही सदस्यांत उपसरपंचपदासाठीचा संघर्ष उघड झाल्याने तीन सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले व शेवटपर्यंत मागे न घेतल्याने गुप्त मतदान होऊन भाऊसाहेब कांचन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र जगताप व सारिका मुरकुटे यांचा ९ मते मिळवीत उपसरपंचपद खेचून घेतले. या प्रकाराने उरुळी कांचन मधील स्थानिक राजकारणातील सुंदोपसुंदी व कुरघोडीचे खेळ यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

सरपंच राजश्री वनारसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.२३) रोजी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या ठरलेल्या निर्धारित वेळेत कोणीही अर्ज माघारी न घेतल्याने उपसरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली. एकुण १५ सदस्यांनी या निवडणुकीत गुप्त मतदान पध्दतीने मतदानात सहभाग घेतला पैकी विजयी उमेदवाराला ९ मते, एका उमेदवाराला ३ तर एका महिला उमेदवाराला फक्त स्वतःचेच मत पडल्याने ९ मते मिळवणारा उमेदवार विजयी झाल्याचे सहायक पिठासीन अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी के.जी.कोळी यांनी घोषित केले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत २ मते बाद झाली.

Previous articleसाप चावलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
Next articleजेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल यांची भेट