वेगरे च्या सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? परिसरात जोरदार चर्चा

पौड-वेगरे ( ता.मुळशी) येथील सरपंच पद रिक्त झाल्याने नवीन सरपंच निवडीकडे वेगरे गावासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2018 मध्ये बिनविरोध झाली होती थेट निवडून आलेल्या सरपंचाने नाट्यमय घडामोडीनंतर राजीनामा दिल्यामुळे सदरचे पद रिक्त झाले असून आता नवीन निवड सदस्यांमधून होणार की थेट जनतेतून निवडून येणार याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे सरपंच पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.

सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांचे पक्षीय बलाबल पाहता 7 पैकी भाजपाचा एक , राष्ट्रवादीचा एक, वंचित आघाडीचे पाच सदस्य आहेत वंचित बहुजन आघाडीचे भोर विधानसभेचे उमेदवार व माजी सरपंच भाऊसाहेब मरगळे यांची या ग्रामपंचायतीवर सलग 15 वर्षे एकहाती सत्ता होती या ग्रामपंचायतीवर मरगळे यांनी स्वतः पत्नीसह प्रतिनिधित्व केले आहे. 2017 मध्ये भाऊ मरगळे यांच्या पत्नी यमुना भाऊ मरगळे यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत पोलीस पाटील पदी नियुक्ती झाल्याने राजकारणातून निवृत्ती घेत गाव एकसंघ ठेवून कायदा ,सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत.

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाऊसाहेब मरगळे यांचे दहा वर्षातील खंदे सहकारी यांची सरपंच पदी बिनविरोध वर्णी लागली होती. परंतु त्यांच्यातील अंतर्गत वैचारिक मतभेदांमुळे मागील दोन वर्षात दोघांनीही गावातील सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांच्या समोरासमोर येणे टाळले होते, त्यामुळे त्याचा परिणाम गावातील विकास कामांवर झाल्याचा दिसून येत आहे.परंतु या दोघांमधील मतभेदाचे कोडे ग्रामस्थांना अजूनही उमगलेले नाही.

त्यामुळे आता नवीन निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून 2018 च्या सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदाच्या रेसमध्ये इच्छुक असलेले उमेदवार अज्ञातवासात गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. तर मरगळे यांनी आपला ग्रामस्थांशी जनसंपर्क कायम ठेवून काम चालु ठेवले होते. नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मरगळे यांच्या पॅनेलमधून एक उच्चशिक्षित पदवीधर सदस्या सुमनांजली आखाडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथील सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण असून यावेळी सदस्यांमधून निवड झाल्यास मरगळे हे सरपंच पदी त्यांच्या भावजय मनीषा मरगळे यांना संधी देणार की मेहुणे राम बावधने यांना की बहीण सोनाबाई कोकरे यांना हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

कारण सद्याच्या एकूण 7 सदस्यांपैकी 6 सदस्य हे मरगळे यांच्या जवळवच्या रक्ताच्या नात्यातील असून त्यामध्ये 2 बहिणी, एक मेव्हणे ,एक भावजय व एक चुलत भाऊ , एक आत्त्याची सून असे स्पष्ट बहुमत मरगळे यांचेकडे आहे परंतु काही समज गैरसमज व अंतर्गत मतभेदांमुळे यातील काही जण दुरावले होते परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने या सर्वांना एकत्र येण्याची नामी संधी मिळली असून त्यांना एकत्र करण्यास मरगळे यांना कितपत यश येईल हे येणाऱ्या काळात दिसेल .

तर जनतेतून निवडणूक झाल्यास मरगळे यांचे खंदे सहकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र गुंड यांची पॅनल मधून जाहीररित्या घोषणा केल्याने त्यांनी तयारीला सुरुवात केली असून नुकतीच त्यांनी मित्रपरिवाराशी स्नेह भोजनाच्या निमित्ताने चर्चा करून, गावात छोटे-छोटे कार्यक्रम घेत तयारीला सुरुवात केली आहे .

आगामी 2022 मध्ये होणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येथील सरपंच निवडी कडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे कारण या गावातील 2 तालुकास्तरीय नेते आगामी निवडणुकीत नशीब अजमावणार असून भाऊसाहेब मरगळे हे वंचित कडून इच्छुक उमेदवार आहेत, तर मिनाथ कानगुडे हे भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष असून हेही प्रयत्नशील आहेत त्यामुळे या निवडीला महत्त्व आले आहे.

याबाबत ग्रामपंचायत सदस्य मिनाथ कानगुडे यांच्याशी संपर्क झाला असता ते म्हणाले — मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून सदस्यांमधून निवड झाल्यास सर्व सदस्य माझ्या सोबत असून जनतेमधून निवड झाल्यास विकासाच्या मुद्द्यावर लोक मला निवडून देतील सांगितले.

भाऊसाहेब मरगळे म्हणाले सात पैकी सहा सदस्य माझ्या सोबत आहेत त्यामुळे जो होईल तो माझ्या विचारांचा सरपंच असेल असे ठामपणे सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य राम बावधने म्हणाले भाऊ मरगळे हे आमचे नेते असून आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत त्यामुळे सरपंच पदासाठी ते नक्की माझा विचार करतील अशी मला अपेक्षा आहे.

येथील जातीय समीकरणे पाहिली असता एकूण मतदारांच्या 80 टक्के मतदार हे धनगर समाजाचे असून सात पैकी सहा ग्रामपंचायत सदस्य धनगर समाजाचे आहेत.परंतु येणाऱ्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल परंतु नेमके कोण सरपंच पदी विराजमान होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Previous articleनायफड येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक
Next articleजनतेच्या प्रश्नांवर नेहमी तत्पर रहा राजगुरूनगर एमएसईबी तोडफोड केलेल्या कार्यकर्त्यांवर राजसाहेब ठाकरे यांची कौतुकाची थाप