प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस सेवेत घ्या

राजगुरुनगर-महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पोलीसांवर कामाचा ताण असून शासनाने 2018 च्या पोलीस भरतीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्यक्रमाने सेवेत सामील करून घ्यावे अशी मागणी होत आहे. याबाबत आगामी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले जावे अशी मागणी भाजप विधानभवन सेक्रेटरी राजु खंडीझोड ,भाजप युवा मोर्चाचे माजी खेड ता.अध्यक्ष अशोकराव टाव्हरे, प्रतिक्षा यादीतील उमेदवार आनंद तनपुरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात 2018 ची पोलीस भरती झाल्यानंतर नव्याने पोलीस भरती झाली नाही.अनेक पोलीस कर्मचारी,अधिकारी निवृत्त होत आहेत, कोरोना समस्येतून पोलिसांना कर्तव्य बजावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. 50वर्षावरील व मधुमेह,रक्तदाब,ह्रदयविकार हे आजार असलेल्यांना मर्यादा येत आहेत.

राज्य सरकारने सर्व पदांची भरती एक वर्ष पुढे ढकलली आहे. आरोग्य खात्याला त्यातून वगळले आहे. पोलीस सेवा ही सध्याच्या काळात अत्यावश्यक झाली असून नवीन भरती प्रक्रीया राबविण्याऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने भरती केले जावे अशी मागणी राज्यभरातून विविध पक्षांचे नेते ,संघटना यांच्याकडून होत आहे.

सध्याच्या पोलीसांना असलेला ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शासनादेश काढून तरूणांना दिलासा दिला जावा अशी मागणी जोर धरत आहे.नवीन पोलीस भरती प्रक्रीया करण्यात वेळ जाणार आहे, त्यापेक्षा लेखी परीक्षा,शारिरीक चाचणी व इतर प्रक्रीया पुर्ण केलेल्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने सेवेत घेणे उचित ठरेल. पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे,त्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना जादा काम करावे लागत आहे,अनेक पोलिसांना राज्यात कोरोना आजार झाला असून काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा व प्राधान्यक्रमाने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस सेवेत घ्यावे अशी मागणी होत आहे.

कोरोना प्रादुर्भावाने पोलीसांवर कामाचा अतिरिक्त ताण असून 2018च्या पोलीस भरती प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तातडीने कार्यवाही करावी.
– राजू खंडीझोड
सेक्रेटरी-महाराष्ट्र भाजप विधानभवन

Previous articleपूर्व हवेली तालुक्यात कोरणा संसर्ग करतोय जोमाने वाटचाल ! उरुळी कांचनमध्ये सापडला नव्याने रुग्ण
Next articleसाप चावलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू