चाकणच्या माजी सरपंचाला भावासह अटक;दोन दिवसांची पोलीस कोठडी

चाकण : पाच महिन्यांपूर्वी पूर्व वैमनस्यतून बावीस वर्षीय तरुणास शिवीगाळ दमदाटी करून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवार व लाकडी दंडणक्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तत्कालीन चाकण ग्रामपंचायतचे माजी सरपंच व त्याच्या भावास गुन्हे अन्वेषण विभागाने अखेर गजाआड केले.

दत्तात्रय किसन बिरदवडे ( वय.४८ वर्षे) या चाकण ग्रामपंचायतच्या माजी सरपंचासह त्याच्या धाकटा भाऊ संतोष किसन बिरदवडे ( वय.४१ वर्षे,दोघे रा.रानुबाईमळा, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रतीक जगन्नाथ लेंडघर ( वय २२ वर्षे,रा. राणूबाईमळा, चाकण) याने याप्रकरणी फिर्याद दिली होती.

याबाबतची अधिक माहिती अशी की,प्रतीक लेंडघर व दत्तात्रय बिरदवडे यांच्या कुटूंब्यात गेल्या अनेक वर्षांपासून पूर्व वैमनस्यातून टोकाचे वाद होते.२६ मे २० रोजी या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.दत्तात्रय बिरदवडे व त्यांच्या पाच साथीदारांनी प्रतीक याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवार व लाकडी दंडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात प्रतीक हा गंभीर जखमी झाल्याने याच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी प्रतीक लेंडघर व दत्तात्रय बिरदवडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दिल्याने चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रतीक लेंडघर व इतर पाच जणांना जामीन मिळाला तर दत्तात्रय बिरदवडे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तेंव्हापासून पोलीस बिरदवडे यांचा शोध घेत होते.शुक्रवार ( दि.३० ऑक्टोबर ) रोजी राणूबाईमळा येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.रात्री उशिरा त्यांना अटक केल्यानंतर त्यांना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस अधिक तपास करत आहेत.

Previous articleजुन्नर वनविभागाच्या जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन स्पर्धेत संजय नाईकरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
Next articleवाकळवाडीत लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा