जुन्नर वनविभागाच्या जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन स्पर्धेत संजय नाईकरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

राजगुरुनगर -वनविभाग जुन्नर व जुन्नर पर्यटन विकास संस्था यांचे वतीने वन्य जीव सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन उपक्रम सादरीकरण स्पर्धेत चासकमान (ता. खेड) येथील संजय नाईकरे यांच्या “तू पुत्र निसर्गाचा”या उपक्रमाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.

संजय नाईकरे बारापाटी कमान येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून ते आणि त्यांच्या पत्नी वैशाली नाईकरे दोघेही कमान येथील कोळोबा डोंगर देवस्थान परिसरात गेली चार वर्षांपासून वन्यजीव व पक्ष्यांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात पाणी व धान्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.याशिवाय ते सातत्याने इतरही अनेक पर्यावरण विषयक उपक्रम राबवत असल्याने त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
या वर्षीच्या वन्य जीव सप्ताहात एकूण ७ विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या विविध गटातील स्पर्धांकरिता सुमारे पाचशे स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी करून सहभाग नोंदवला होता.

निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करण्यात आला.
विविध विभागातील स्पर्धांचे बक्षीस वितरण आज श्री जयरामे गौडा आर. उपवनसंरक्षक जुन्नर यांचे शुभ हस्ते पार पडले.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जुन्नर येथे प्रातिनिधिक स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. मुग्धा चींचकर या चिमुकलीने आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी श्री यश मस्करे अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था,मनोज हाडवळे संस्थापक,राधाकृष्ण गायकवाड, शिरिष भोर,रवींद्र काजले आदी उपस्थित होते.श्री.अजित शिंदे यांनी प्रास्तविक केले, श्रीमती.सुनीता वामन यांनी सूत्रसंचालन केले,रमेश खरमाळे यांनी आभार मानले. शशिकांत मडके,शिवाजी सोनावणे,राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.

खेड तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व शिक्षणासह सामाजिक क्षेत्रातीलही अनेक मान्यवरांनी संजय नाईकरे यांचे अभिनंदन केले आहे.

“खेड तालुक्यातील अनमोल निसर्ग संपदेचे जतन,रक्षण व संवर्धन करण्यासाठी स्वतःला जबाबदार घटक मानणा-या प्रत्येकाने आपला स्वतःचा एक कृति कार्यक्रम तयार करावा व आपापल्या क्षमतेप्रमाणे परिसरातील निसर्गाचे रक्षण व संवर्धन करावे.पर्यावरण रक्षण व संवर्धन ही आपल्या सर्वांचीच एक प्रमुख जबाबदारी आहे.
संजय नाईकरे

Previous articleदुसऱ्याचे घर बळकावल्यामुळे दांपत्याला अटक
Next articleचाकणच्या माजी सरपंचाला भावासह अटक;दोन दिवसांची पोलीस कोठडी