कहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबाचे लोकप्रतिनिधीनी भेट घेऊन केले सांत्वन

Ad 1

पुणे- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरण येथे कहू येथील भोराबाई बुधाजी पारधी (वय 43) व नातू साहील दिनेश पारधी (वय, वर्षे 4) या काल( दि.२२) रोजी वेताळे गावातून राहत्या घरी कहू गाव येथे जात असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे चासकमान धरणाजवळील जॅक वेल येथे वादळापासून पावसापासून बचाव करण्यासाठी गटारीच्या मोरीत थांबल्या होत्या पण अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यामुळे नातवासह वाहून गेल्या होत्या.


काल सकाळी पुन्हा सहा वाजता शोधकार्य सुरू केले असता दुपारी बाराच्या सुमारास मुळशी आपत्ती व्यवस्थापन गटाला यश आले व मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज घटनास्थळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, कृषी व पशुसंवर्धनचे मा सभापती अरूणशेठ चांभारे, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ऍड अरुण मुळूक,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.निर्मला पानसरे यांचे पती ऍड सुखदेव पानसरे यांनी भेट दिली व आपत्तीग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून शासकीय मदत मिळण्यासाठी पूर्ण पाठपुरावा करू तसेच या ठाकर समाजातील कुटुंबाला आवश्यक ती पूर्ण मदत करू असे अरुण चांभारे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच ऍड संतोष दाते, पोलिस पाटील अनिल दाते,गौतम ससाणे,वसंत दाते,गणेश वाढाणे, लन्कु वाढणे, गणपत वाढाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.