होय,आहे आमच्या मनात खंत खेड तालुक्यात राहूनही परप्रांतीय असल्याची-सुप्रियाताई साठे

मी.. सुप्रियाताई साठे ठाकूर (रा.ठाकूर पिंपरी,ता.खेड,जि. पुणे )

बऱ्याच दिवसापासून मनात माजलेल काहूर समाजापर्यंत कस पोहोचवाव हा विचार करत होते. कारण माझं क्षेत्र वक्तृत्वाशी निगडित आणि कोरोना च्या कालावधीत वक्तृत्वाच्या वाटा बंद. म्हणून लेखणी हातात घेण्याचा विचार आला आणि तो तुमच्या पर्यंत पोहोचावा म्हणून हा प्रपंच.

खेड तालुका म्हणजे तरुणांचा तालुका.युवाशक्ती आहे मात्र सर्वत्र विखुरलेली. कोणी या पक्षाचा कार्यकर्ता तर कुणी त्या पक्षाशी बांधील. आत्तापर्यंत सर्वच जणांनी तरुणाईचा वापर मतांसाठी करून घेतला. याच तरुणाईच्या जोरावर आंदोलने घडवली, मात्र ती स्वतःच्या स्वार्थासाठी. या आंदोलनाने तरुणांना बरच काही दिलही, पोलिसांचा मार, गावात इज्जतीचे धिंडवडे,कधीच न संपणाऱ्या पोलीस स्टेशन, कोर्ट, दवाखान्यांच्या खेट्या. यातून तरुणाईने फायदा काय मिळवला ही चिंतनाची बाब आहे.

खेड तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला. निसर्ग देवतेने इथे निसर्ग सौन्दर्याची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. या तालुक्यात दोन धरणे ही जलदेवतेच्या आशीर्वाची जणू साक्ष देतात. सह्याद्री च्या रांगांनी मध्यस्थी करून वेगळा केलेला कोकण आणि दक्खन याच तालुक्यात. मात्र या ठिकाणांना पर्यटनस्थळे बनवून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे राज्यकर्ते कमी पडले. धरणांच्या कडेला होऊ शकणारा हॉटेल व्यवसाय कधी तिथल्या तरुणांच्या लक्षात कोणी आणूनच दिला नाही. कारण कार्यकर्ता मोठा झाला की नेत्याला त्रासदायक , म्हणून तर नाही ना..?

खेड तालुक्यात श्रीमंती गजपदाने आली त्याला कारण MIDC. होय, MIDC ने आमच्या दक्षिण भागाला बक्कळ श्रीमंत केले, पण ती श्रीमंती फक्त गाडी, बंगला, सोने, सोहळे हे दाखविण्या इतकीच ? त्या गावांमधील जागा विकताना त्या जागांची किंमत कवडी भावाने मिळाली. इथे आमच्या जागेत सोन पिकणार आहे याची तिळमात्रही कल्पना त्यांना देण्यात आली नव्हती. इथे कॉन्ट्रॅक्ट बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच मिळाले, बाकी सारे उपाशी राहिले. बाहेरच्या तालुक्यातील आमदार, खासदार, गुंड प्रवृत्तीचे लोक इथे मनमानी कारभार दादागिरीने करतात. आमचे राज्यकर्ते इथल्या तरुणांना पाठबळ देण्यास निष्फळ ठरले हे आमचे दुर्दैव. ….

खेड तालुक्यातील भामा आसखेड हे धरण बांधण्यासाठी अनेक लोकांना आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपल्या जमिनी, घरे, सगळी स्वप्ने धरणात विसर्जित करावी लागली, त्यांनी ती आनंदाने केलीही,मात्र गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला जमिनी मिळाव्यात ही मागणी अजूनही त्यांना भिक्षेकऱ्यासारखी करावी लागते. ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांच्या पुढार्यांनीच हडप ही केल्या. जमिनी गेल्या पण हक्काचे पाणी पुण्याला गेले, ते अडविण्यात आमचे राज्यकर्ते कमी पडले, अजून उर्वरित पाणी पिंपरी चिंचवड ला नेण्याचे षडयंत्र बाकी आहे ते नेले की पूर्व पट्ट्यातील अनेक गावे ज्यांच्या जमिनी बागायती आहेत आणि त्यावर च त्यांची गुजराण चालते ते शेतकरीही जमीनदोस्त होणार हे निश्चित…..

खेड तालुक्याचं भाग्य थोर च म्हणून तेराव्या शतकातील महान संत ज्यांना विश्व माऊली म्ह्णून संबोधले जाते ते श्रीमंत ज्ञानोबाराय खेड तालुक्यातले, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर याच तालुक्यात, पुणे जिल्ह्याचे कुलदैवत असणारे निमगाव दावडी,खरपुडी चे खंडोबा देवस्थान या तालुक्यातले, कुंडेश्वरासारखे मनोहारी, नयनरम्य, डोंगराच्या कुशीत वसलेले देवस्थान याच तालुक्यातले, जागृत असणारी यमाई याच तालुक्यातील, महान संत सटवाजी बाबा देवस्थान इथेच, प्रति भिमाशंकर शंभू देवस्थान इथेच, तुकोबारायांची साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर इथेच, ज्या लाडक्या मुलीसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून खाली आले त्या भागीरथी माता याच तालुक्यातल्या येलवाडी गावाच्या, तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी दोन टाळकरी संताजी महाराज जगनाडे, गंगाराम बुवा मवाळ तेही अनुक्रमे सुदुंबरे आणि कडूस गावचे म्हणजे इथलेच, श्रीपती बाबांसारखे त्रिकालज्ञ महात्मे म्हाळुंगे नगरीचे तेही इथलेच बच्चे बाबा उर्फ वाजवणे बाबां सारखे कट्टर वारकरी ही वाजवणे गावचे म्हणजे इथलेच. इतकी महत्वाची तीर्थक्षेत्रे असतानाही त्यांच्याकडे समर्पक पणे लक्ष देऊन त्याबद्दलची माहिती लोकांना सांगून त्यांना प्रसिद्धी झोतात आणता आले नाही.

खेड तालुक्यातीलच नव्हे तर देशातील सर्वच युवकांसाठी स्फूर्ती आणि प्रेरणा स्थान असणारे ज्यांनी आपले नाव देशाच्या इतिहासात रक्तरंजित सुवर्ण अक्षराने लिहिले, देश स्वतंत्र करण्यासाठी जहाल क्रांतीचा मार्ग अवलंबून देशाचा जाज्वल्य अभिमान उरी बाळगून स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मा राजगुरू याच तालुक्यातले, आम्हाला मात्र त्यांचा पूर्णपणे विसर पडलाय कारण त्यांचे निवासस्थान. त्यांची चरण कमळे ज्या घराला लागली त्या घराला पाहू गेल्यास लक्षात येते की येणारे पर्यटक त्या घरातील जळमटांबरोबर आमच्या बुद्धीला लागलेली जळमाटेही त्यांना आनंदाने दाखवतो.

खेड तालुक्यामध्ये अनेक माता भगिनीही उत्कृष्ठ रित्या अनेक क्षेत्रात कामे करतात, त्यात कुणी जिप अध्यक्ष, सदस्य, पंस सभापती, उपसभापती, सदस्य, सुत्रसंचालक, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजिका, शिक्षिका, पोलीस अधिकारी, इतर अधिकारी, किर्तनकार म्हणून आपापल्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक कमावला आहे, पण त्यांच्या कार्याचा गौरव कधी झाला नाही की कधी तोंड भरून कौतुकांची स्तुतीसुमने त्यांच्यावर उधळल्या गेली नाहीत, हे दुर्दैव. ..

एवढा लेखन प्रपंच करण्याचा एक च मानस आहे तो असा की खेड तालुक्याला इश्वरदत्त देणगी मुबलक प्रमाणात आहे, मग ती युवाशक्ती असो की श्रीमंती, निसर्ग संपत्ती, जल उपलब्धी, तीर्थ क्षेत्रांची महती, स्वातंत्र्य सेनानींची परमगती, पात्र माणसांची मांदियाळी असो. पण या सर्वांचे योग्य ते नियोजन जे आत्ता पर्यंत अपेक्षित होते ते न होता सर्व उपेक्षित राहिले. इथून पुढे तरी सर्वांनी मिळून याचा विचार करावा आणि तालुक्याच्या समृद्धी आणि संपृक्ततेला शोभेल असे कार्य करावे ही अपेक्षा….!

Previous articleडॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्वचं कर्मचारी रुग्णांसाठी ‘देवदूत’- डॉ.राहुल कराड
Next articleधक्कादायक-चार दारूड्या मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवावा म्हणून  पत्नीला  लोखंडी राँडने बेदम मारहाण,पतीसह चौघा मित्रांवर गुन्हा दाखल