लोणावळ्यात अवैध शस्त्र साठा जप्त,एकाला अटक

Ad 1

लोणावळा-फरारी आरोपीच्या शोधात असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने धडक कारवाई करून दोन पिस्तूल व रेम्बो चाकूसह आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कारवाई रात्रीच्या सुमारास लोणावळा शहर हद्दीत करण्यात आली. सूरज विजय अगरवाल असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे एका फरार आरोपीच्या शोधात असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने लोणावळा येथील कल्पतरू हॉस्पिटल समोरील वर्धमान सोसायटीतील गुरुकृपा डिस्ट्रिब्युटर या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी येथे असलेल्या सूरज विजय अगरवाल याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी व काडतुस मिळून आले. तसेच गोडाऊन मधील लोखंडी रॅक मध्ये १ गावठी पिस्तूल, असे एकूण २ पिस्तुल, कोयता व रेम्बो चाकु असा १ लाख ९०० रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा मिळून आला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. सदर आरोपी व जप्त केलेला माल गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे. याबाबत अक्षय अजित नवले पोलीस हवालदार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहा पो उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, सहा पो उपनिरीक्षक एस के पठाण, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, लियाकतअली, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली.