मांजरवाडी येथे कांदा चाळीतील कांदे चोरणाऱ्या चोरट्याला गावकऱ्यांनी पकडले तर दुसरा फरार

नारायणगाव ,किरण वाजगे-

हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवाची जाळी (ता. जुन्नर) येथे आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कांदा चाळीतील कांदा चोरणाऱ्या दोन चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांमुळे निष्फळ ठरला आहे.

यापैकी एका चोरट्याला जागृत शेतकऱ्याने पकडून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून दुसरा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेतील आरोपी संजय गेनभाऊ पारधी याला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार पोपट काळे हा फरार झाला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

देवाची जाळी शिवारातील शेतकरी अनिल चक्कर पाटील व नाथा कोंडाजी थोरात या शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला आहे. आज (दि. २२) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी काळे व पारधी हे दुचाकी व मालवाहतूक रिक्षा घेऊन देव जाळी येथे कांदा चोराण्यासाठी आले. चाळीमधील कांदा गोणीत भरून तो मालवाहतूक रिक्षात भरत असताना येथील शेतकरी दिलीप थोरात यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील इतर शेतकरी जागे झाले.

दरम्यान काळे हा मालवाहतूक रिक्षा घेऊन पसार झाला. मात्र जाधव याला शेतकऱ्यांनी दुचाकीसह पकडले व नारायणगाव पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान जाधव याने चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

काही दिवसांपूर्वी वडगाव कांदळी येथील गुलाब इस्माईल पठाण तसेच हिवरे तर्फे नारायणगाव येथील बबन भोर व खोडद येथील शिवाजी खरमाळे या शेतकऱ्यांच्या चाळीतील सुमारे ९० हजार रुपये किंमतीच्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. आजच्या या घटनेनंतर कांदा चोरीची परिसरातील ही चौथी घटना आहे.

अवकाळी पाऊस, वादळी पाऊस आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना शेतकऱ्यांनी गेली सहा ते आठ महिने कांदाचाळीत साठवून ठेवलेला कांदा अशा पद्धतीने चोरी जाऊ लागल्याने शेतकर्‍यांसमोर एक नवीन समस्या उभी राहिली आहे.
दरम्यान पोलिसांनी रात्रीची गस्त पथके नेमून अशा भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Previous articleदौंड मध्ये रुग्णांना फळे वाटप
Next articleओला दुष्काळ जाहीर करावा – अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेची मागणी