उद्योजकाकडे पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल

Ad 1

पुणे-पुरंदर तालुक्यात बोगस युट्युब चँनलच्या पत्रकारांनी धुमाकूळ घातला आहे. चावडी न्यूज नावाने दुकान थाटलेल्या निलेश जगताप (रा. सासवड) या तोतया पत्रकारावर ( दि.१९) रोजी कलम ३८५ व कलम ५०६ अंतर्गत खंडणी व हप्ता मागण्यापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन शहा या कंपनी मालकाने याबाबत सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, चंदन शहा यांची जाधववाडी येथे एव्हरग्रीन मायक्रो न्यूट्रिएन्ट नावाची खताची कंपनी आहे. गुरुवारी (दि. १५) या कंपनीत जगताप विनापरवाना फॅक्टरीमध्ये आला. आत येऊन त्याने कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे फोटो काढले. हे कामगार विनामास्क काम करीत आहेत. याबाबत माझ्या यू ट्युब चॅनलवर बातमी लावणार आहे. बातमीमुळे होणारी बदनामी टाळायची असल्यास ५ लाख रुपये एकरकमी द्या, किंवा २० हजार रुपये दरमहा याप्रमाणे पैसे द्या, अशी मागणी त्याने कंपनीचे व्यवस्थापक नरेश सिंग यांच्याकडे केली. त्यावर कंपनीच्या मालकांशी बोलतो असे सिंग यांनी सांगितले. त्यानंतर सिंग यांनी शहा यांना फोनकरून सगळी माहिती सांगितली. त्यानंतर सोमवारी (दि. १९) निलेश जगताप याने मॅनेजरला फोन करून दिवे येथील हॉटेल पेशवा येथे या असा निरोप दिला. मालक शहा, त्यांचा मुलगा व व्यवस्थापक असे तिघेजण हॉटेल पेशवा येथे जगतापला भेटायला गेले. आम्ही आमची चूक सुधारू, असे मालकाने सांगितले. त्यावर ‘तुम्ही सुधारणा केल्यास माझा काय फायदा’ असा प्रश्न करून त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. मात्र, शहा यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असता तो तिथून रागाने निघून गेला. जाताना चॅनेलवर कंपनीची बदनामी करणारी बातमी देणार असल्याचेही तो म्हणाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करीत करीत आहेत.