जनावरांस चरावयास दिलेल्या रानाचे पैसे न दिल्याने भावाने भावावर केला गोळीबार

Ad 1

 राजगुरुनगर : जनावरांस चरावयास दिलेल्या रानाचे पैसे न दिल्याने झालेल्या किरकोळ वादातून भावाने भावावर गोळीबार केला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना किवळे (ता.खेड) येथे घडली.

    याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमनाथ विठ्ठल म्हसे (वय-२४, रा.किवळे,लिंबळेवस्ती,ता.खेड) भाऊ वैभव, आई हिराबाई, वडील विठ्ठल, बहिण ललीता दत्तात्रय पडवळ, मेहुणे दत्तात्रय पडवळ आणि श्रीमती नैना कमलेष गुंडाळ असे घरासमोरील अंगणात बसले असतांना त्यांचा चुलत भाऊ नवनाथ धोंडीबा म्हसे याने त्याचे रान सोमनाथ यांनी गुरे चारण्यासाठी भाडोत्री घेतले असतांना व त्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन तसेच सोमनाथ यांची गाय त्यांचे शेतात गेल्याच्या कारणावरुन त्याने फोनवरुन सोमनाथ यांचा भाऊ वैभव यास  माझेकडे लायसन असलेले पिस्तुल आहे, मी घरी आल्यावर तुमची चरबी काढतो. अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या घरी येवुन वैभव याचा शर्ट धरुन शिवीगाळ केली. सोमनाथ याच्या तसेच वडील व आई यांचे अंगावर धावुन येवुन पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. त्यानंतर सर्वजण  त्याला समजावत असताना सोमनाथ व नवनाथ दोघे घराच्या मागे गेले असता तेथे नवनाथ याने सोमनाथला थांब, तुला आता खलास करुन टाकतो, असे म्हणुन जिवे मारण्याचे उद्देषाने सोमनाथवर  गोळी झाडली. परंतु सोमनाथने हुलकावणी दिल्याने गोळी चुकली, आणि त्याचे प्राण वाचले.

        याप्रकरणी नवनाथ धोंडीबा म्हसे याच्यावर खेड पोलीस स्टेशन येथे भा.द.वि कलम३०७, ५०४, ५०६ (२) व अकारण शस्त्र बाळगणे कलमान्वये गुन्हा दाखल केला असून नवनाथ यास त्याच्या वाहतूक व्यवसायाकामी शस्त्र परवाना शासनाने दिला असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास खेड पोलीस स्टेशनच सहायक पोलिस निरीक्षक निलेश बडाख हे करत आहेत.