राजगुरुनगर वाचनालयाची दुर्मिळ पुस्तके  इंटरनेटवर

राजगुरुनगर : महाराष्ट्रातील सर्वात पहीला व पथदर्शी प्रकल्प राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयाने साकारला असून ग्रंथालय चळवळीत हे एक मानाचं पान समजलं जाणार आहे. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयातल्या दुर्मिळ २४ पुस्तके आणि एका हस्तलिखितासह एकूण ६३०० पानांच्या अमूल्य ज्ञानभांडाराचं डिजिटल स्वरूपात रूपांतर झालंय. एकीकडे कोरोनासारखे संकट असताना राजगुरुनगरचा हा अमूल्य ठेवा आता सातासमुद्रापार राहूनही एका क्लिकवर काही क्षणात मिळू शकणार आहे. मौखिक ते लिखित परंपरेचं आता डिजिटल रूपांतरामुळं येणाऱ्या पिढ्यांनाही हे ज्ञान उपलब्ध होऊ शकणार आहे. अशी माहिती या वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी दिली.

       सन १८६२ मध्ये काही पोथ्या व पुस्तकांच्या भांडवलावर येथील समाज धुरंधरांनी ‘जनरल नेटीव्ह लायब्ररी, खेड’ नावाने स्थापन केली. ज्ञान संपादनाची वास्तू म्हणून समाजानेही सहकार्याचा हात दिला. यातून वाचनालयाने प्रगती साधत पुस्तके व सभासद वाढवत नेले. त्याचबरोबर सर्व पुस्तकांचे जतनही केले या पैकी २४ पुस्तके व एक हस्तलिखिताचे एकूण ६३००पाने तेही सन १९०० पूर्वीची, यांचे डिजिटायझेशन करून हा अमुल्य वैभवशाली ठेवा नव्या दिमाखात इंटरनेटवर उपलब्ध झाला आहे.

   सन १८३२ ते १९०० पर्यंतचा हा ठेवा आहे. महाराष्ट्र शासनाच्या दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करून हा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था मुंबई या शासनाच्या अंगीकृत संस्थेने फेब्रुवारी २०१८ मध्ये ठाणे येथे महाराष्ट्रातील शतायु वाचनालयाची दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. तेथील आवाहनास महाराष्ट्रातील ८७ शतायु वाचनालयांपैकी राजगुरूनगरच्या सार्वजनिक वाचनालयाने प्रतिसाद देऊन या पथदर्शी प्रकल्पाचे प्रथम मानकरी होण्याचा मान मिळविला आहे . हे सर्व  साहित्य विकिमीडिया कॉमन्स या प्रकल्पात बुक्स इन मराठी या मुख्य वर्गातील बुक्स वीथ पब्लीक लायब्ररी, राजगुरुनगर पब्लीश्ड बिफोर १९०० या उपवर्गात उपलब्ध झाले आहे. तसेच विकिस्त्रोत या प्रकल्पात युनिकोडमध्ये उपलब्ध आहे. वाचक, अभ्यासक, जिज्ञासू यांना हा ठेवा मुक्तपणे व मोफत वापरता येइल. तसेच लिंक पाठवून, डाऊनलोड करून याचा प्रसार करता येणार आहे.

         हा सर्व डिजिटायझेशन प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहयोगातून पूर्ण केल्याचे सांगून या संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याद्वारे मराठी भाषेतील दुर्मिळ पुस्तकांचे जतन करण्याचा उद्देश असून शतायु वाचनालयाकडे असणाऱ्या या दुर्मिळ ठेव्याचे जतन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत या पुस्तकांची दुरुक्ती (पुर्नरावृत्ती) न होण्याचा संकल्प मांडण्यात आला होता. त्यानुसार अगदी पहिल्याच राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयाने या प्रकल्पास होकार दर्शवित हा प्रकल्प पूर्ण केला असून ही प्रक्रिया निरंतर चालूच राहणार असून वाचक, अभ्यासक, जिज्ञासू यांना ठेवा मुक्तपणे व मोफत वाचता व उतरवून (डाऊनलोड) करून घेता येणार आहे.

        विज्ञान आश्रम पाबळ येथील संस्थेचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी या डिजिटायझेशन प्रकल्पातील प्रथम काम स्कॅनिंग विकी प्रकल्पात अपलोड करणे आणि ओसीआर प्रक्रीया करुन युनीकोड मध्ये रुपांतर करण्याचे काम ग्रामिण भागातील युवतींनी पुर्ण केल्याचे सांगुन , यामुळे या भागातील मुलींना आधुनीक कौशल्ये आणि रोजगारसंधी उपलब्ध झाल्याचे सांगितले.हा सर्व ठेवा मुक्त ज्ञानस्त्रोत प्रकल्पांतर्गत पूर्ण करण्याचे काम करणाऱ्या प्रोग्राम ऑफीसर, सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटीचे कार्यक्रम अधिकारीे श्री. सुबोध कुलकर्णी यांनी या प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, विस्मृतीत गेलेले व शोधण्यास अवघड असे हे मौलीक संदर्भ साहीत्य मुक्तस्त्रोतात उपलब्ध झाल्याने चिरंतन झाले आहे. त्यातील प्रत्येक शब्द आता सर्चेबल झाल्याने ग्रंथातील अनेक लपलेल्या किंवा दुर्लक्षित जागांच्या संदर्भात संशोधन , अभ्यास होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा साहीत्यास ‘ देशी हुन्नर ‘ , ‘ विधवा विवाह ‘ , ‘भारतीय ज्योतिःशास्त्र ‘ , ‘ प्रमाणशास्त्र ‘, ‘ केरळ कोकीळ ,सखाराम बाईंडर या ग्रथांचा समावेश आहे.या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन अनेक वाचनालये असे प्रकल्प करण्यास पुढाकार घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रथम स्कॅनिंग ते ओसीआर प्रक्रिया पूर्ण करून मुक्तस्त्रोत माहिती जालावर उपलब्ध करून देताना सर्वांना ती सहज शोधनपध्दती सोपी करण्यात आली आहे. ही सर्व दुर्मिळ ग्रंथसंपदा विकिमीडिया कॉमन्सवर सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर असा शोध घेतल्यास उपलब्ध असल्याचे सांगितले.

Previous articleशिरूर येथील अल्पवयीन दुचाकीचोर ताब्यात : खेड पोलिसांची कामगिरी
Next articleशिरोलीत एक लाख ४७ हजारांची जबरी चोरी