गावठी पिस्तुल व जिवंत काडतुससह सराईत गुन्हेगार जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने हडपसरच्या सुजीत वर्मा गँगमधील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांस जेरबंद केले आहे. त्याचेकडून एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे ( वय २१, रा.शांतीसागर वसाहत, आकाशवाणी समोर, हडपसर पुणे ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघमारे याला कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून ५० हजार ३०० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी नव्याने पदभार घेतलेले पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालणेसाठी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मार्गदर्शनाखाली विभागानुसार गुन्हे शाखेच्या पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

मंगळवार ( २० ऑक्टोबर ) रोजी पोलीस घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलले गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, प्रमोद नवले यांचे पथक सायंकाळचे सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत गस्त घालत लोणी काळभोर फाटा येथे थांबलेले असताना त्यांना लोणी स्टेशन चौकातील मनोहर क्लॉथसमोर एक निळे काळे रंगाचा टि शर्ट घातलेला इसम कमरेला पिस्तुल लावून दहशत निर्माण करीत असल्याची माहीती एका खबऱ्याकडून मिळाली. त्याप्रमाणे सदर पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जावून सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयितरित्या फिरत असलेला प्रतिक वाघमारे यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेवून त्याचे कमरेला असलेले विनापरवाना बेकायदेशीर हेतुस्तव बाळगलेले एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण ५० हजार ३०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व त्याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले असून त्याचेवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

प्रतिक वाघमारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी हडपसर पोलीसठाण्याचे हद्दीत दरोडा तयारी, घरफोडी, विनयभंग व दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापूर्वी पुणे शहर व जिल्हयातून तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

सुमारे पाच माहिन्यापूर्वी भेकराईनगर हडपसर येथे खून झालेला वर्मा गँगमधील सराईत मयत गुन्हेगार सोएब शेख हा यातील आरोपी प्रतिक वाघमारे याचा जवळचा जोडीदार होता. त्या अनुषंगानेही स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास चालू आहे. वाघमारे याने सदरचे गावठी पिस्तुल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे का ? याबाबतचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे करीत आहेत

Previous articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत मदने यांची निवड
Next articleशिरूर येथील अल्पवयीन दुचाकीचोर ताब्यात : खेड पोलिसांची कामगिरी