महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची नुकसानभरपाई द्या- रुपाली राक्षे पाटील

Ad 1

राजगुरूनगर-शासनाने नुकसानाचे पंचनामे करून  महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व पिकांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,अश्या मागणीचे निवेदन (दि,21) रोजी खेड तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छावा युवा महासंघाच्या वतीने पाठविण्यात आले.

तर सध्या महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच आक्रमक पण सावध फलंदाफलंदाजी करत पावासाने सुरुवात चांगली केली. अधून मधून ओढ देत पिकाला टॉनिकवजा संजवनी देत पाऊस पडत गेला.पिके जोरात आली.

यावर्षी उत्पन्नाचे रेकॉर्ड ब्रेक होणार असे वाटत असतानाच नियमानुसार 15 सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने धुवाधार व न थांबता कोठे मुसळधार तर कोठे संततधार करत पाणी पाणी केले. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. महत्वाचे म्हणजे जमिनीवरील सोयाबीन,कापूस पीक पाण्यात गेले तर ते गेलेच परंतु जमिनीला पाझर फुटून अनेक शेतात कापूस उबलून जाग्यावरच करपले असून हातातोंडाशी आलेला पीक पण गेल्यामुळे शेतकरी आता हताश झालेला दिसत आहे.तर याच निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाच्या लपंडावामुळे ऊस लागवड क्षेत्रांत कमालीची घट झाली. पावसाच्या बेभरवशामुळे शेतकरी वर्गाने नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची निवड केली. गरिबाचा ऊस व शेतकऱ्यांचा दिवाळी बोनस म्हणून सोयाबीन पिकाकडे लोक पाहू लागले. त्यालाही कधी अस्मानी तर कधी सुलतानी तर कधी कधी डबल संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यावर येते.पेरणीपासून हातात पैसे पडेपर्यंत संकटेच संकटे मग ते कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे पास झालेले बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणी, त्यातही कसे बसे पेरले तर खत कमतरता, पेरणीची परवड, मजुराची आकड, अस्थिर बाजारभाव आणि व्यापाऱ्यांकडून होणारी दबंगाई लूट अश्या अनेक संकटाची दिव्य पार पडल्यानंतर कुठे शेतकऱ्यांच्या हातात छदाम किंवा दमडी राहते. यावर्षी सुरुवातीला दमदार पाऊस झाला पीकही बऱ्यापैकी आले.

परंतू,15 सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासाला निघालेल्या वरुणराजाने शेतातील कापणीला आलेल्या व उभ्या असलेल्या पिकाचे तीनतेरा आणि नऊ अठरा केले. कोठे मुसळधार, कोठे संततधार, तर कोठे धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन व कपाशीचे फडच्या फड पाण्यात गेले तर कापूस पीक करपुन पात गळत असल्याचे दिसत आहेत. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगाला कोंब सुद्धा आले असून शासन प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता डोळ्याचे पाणी पुसून शेतकऱ्यांना राज्यसरकारने दिलासा देऊन महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा व 50 हजार हेक्टरी मदत द्यावी अश्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार मार्फत पाठविले यावेळी छावा युवा महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई राक्षे पाटील यांनी दिले.यावेळी अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.