नारायणगाव येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून चार दुकाने खाक ;५३ लाख रुपयांचे नुकसान

Ad 1

किरण वाजगे- नारायणगाव (ता.जुन्नर) येथील पोलीस स्टेशन समोरील चार दुकाने शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली. ही घटना सोमवार दिनांक २० रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत सुमारे ५३ लाख रुपययांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिती मंडलाधिकारी काळे भाऊसाहेब व तलाठी सैद भाऊसाहेब यांनी दिली.


प्रथम टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीचे स्वरूप सुरुवातीला सौम्य होते. मात्र अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत चारही दुकाने जळून खाक झाली.

दरम्यान दुकानाचे मालक बाळासाहेब उर्फ मनोहर जगन्‍नाथ दळवी व स्थानिक नागरिक तसेच त्यांची मुले देखील तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना विनवणी करत होते की, एकदम कडेचे दुकान आपण खोलून त्यातील मसाल्याचा माल काढूया मात्र पोलिसांनी कोणाचेही न ऐकता अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत कोणालाही पुढे जाऊन दिले नाही. या घटनेत मनोहर जगन्नाथ दळवी यांचे मसाले विक्रीचे दुकान तसेच विनीत मेथा यांचे इलेक्ट्रिक दुकान, महंमद नासीर यांचे टायर दुरुस्ती दुकान व सचिन डोके यांचे पंप विक्री – दुरुस्तीचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

दरम्यान या घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी काळे, तलाठी सैद भाऊसाहेब, गणेश गाडगे यांनी केला असून या घटनेमध्ये जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील जळीत ग्रस्त कुटुंबाने केली आहे.

यावेळी नुकतेच रुजू झालेले जुन्नर चे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी घटनास्थळी भेट दिली.