जलसंपदा विभागाशी निगडित विविध प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांसमवेत आमदार राहुल कुल यांची बैठक

सचिन आव्हाड

दौंड तालुक्यातील जलसंपदा विभागाशी निगडित विविध प्रश्नांसाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आमदार राहुल कुल यांची मंत्रालयात विशेष बैठक काल पार पडली . खडकवासला प्रकल्पावरील सुरु असलेल्या व प्रस्तावित दुरुस्तींच्या कामांची सद्यस्थिती, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांचे यांचेकडील विशेष दुरुस्ती आराखड्याचे नियोजन, महाराष्ट्र जलसंपदा नियामक महामंडळाच्या नियमांनुसार पुणे महानगरपालिकेद्वारे वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियमन व वापरलेले पाणी पूर्ण क्षमतेने पुनर्प्रक्रिया करून शुद्ध करून सिंचनासाठी मिळावे आदी महत्वपूर्ण विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली .

या बैठकीस सचिव, जलसंपदा व्यवस्थापन व लाभक्षेत्र विकास संजय घाणेकर साहेब, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ राजपूत साहेब , मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे गुनाले साहेब, अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे , निलेश भोईर , कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग विजय पाटील साहेब हे उपस्थित होते.

बेबी कालव्यावर दौंड व हवेली तालुक्यातील मोठे शेतीचे क्षेत्र सिंचनासाठी अवलंबून असून या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यातील ४० टक्केच पाणी खाली (टेलला) पोहोचते त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे त्याबाबतचे प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी याआधी सादर करण्यात आले असून त्यास जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची मान्यता देखील मिळाली आहे, त्याचबरोबर जुना व नवीन मुठा कालवा अस्तरीकरण बाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार कुल यांनी केली .

पुरंदर उपसा सिंचन योजनेतील दौंड तालुक्यातील खुपटेवाडी फाटा येथील तांत्रिक अडचणी दूर करणे व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील तलावांना जोडणाऱ्या जोडकालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण करणे, लाळगेवाडी व पडवी, येथील गायकवाडवस्ती तलाव जोड कालवा यांची कामे करणे, खोर, ता. दौंड येथील डोंबेवाडी तलावात बंद नळीतुन पाणीपुरवठा करणे आदी कामे प्रलंबित त्याची शासनाने त्वरित दखल घ्यावी.

दौंड तालुक्यातील जलसंपदा विभागाशी निगडित विविध प्रश्नांसाठी आपण शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत असून मागील शासनाच्या काळात जलसंपदा विभागाच्या अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळविली आहे त्या सर्व कामांना गती देण्याचे आश्वासन उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे .

Previous articleओढ्याच्या पाण्यात दुचाकी सह चौघे वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू
Next articleकनेरसर येथे “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी