रतिलाल बाबेल यांचा पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक

नारायणगाव  (किरण वाजगे)

पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेमध्ये नारायणगाव येथील गुरुवर्य सबनीस विद्या मंदीराचे ज्येष्ठ शिक्षक रतीलाल बाबेल यांनी जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला

जुन्नर पर्यटन विकास संस्था व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने, जुन्नर कला मंचाच्या व्यासपीठावर पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लॉक डाऊनच्या काळात आपला घरगुती गणेशोत्सव, हा निसर्गपुरक असावा, त्यात कलात्मकता असावी, सर्जनशीलता दिसावी तसेच, टाकाऊ वस्तुंचा कल्पक वापर असावा या उद्देशाने, जुन्नरमधील कलेला प्रोत्साहन द्यावे म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात रतिलाल बाबेल यांचा ‘पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेत’ तालुक्यात प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष विलास कडलाक, सेक्रेटरी सुनील जाधव व जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे यांनी दिली.

रतीलाल बाबेल यांनी आपल्या घरातील गणपती समोर विज्ञान ,गणित ,कला , क्रीडा व्यवसाय ,इतिहास यासारख्या विविध विषयांची पुस्तके मांडून रचना केली होती. वाचू आनंदे या थीम द्वारे ज्यांनी घरच्या गणपती ला भेट दिली त्यांना एक पुस्तक बाबेल यांच्याकडून भेट देण्यात आले.जुन्नर तालुक्यातील या स्पर्धेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला.

रतीलाल बाबेल यांना प्रथम क्रमांकासाठी असणारे रुपये ५००१ व प्रमाणपत्र जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे डायरेक्टर मंगेश हाडवळे व अमर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते देण्यात आले. गेल्या सात वर्षापासून रतिलाल बाबेल गणपती काळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. यावर्षी त्यांनी “वाचू आनंदे” या थीम बरोबर राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यालाही राज्यभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. बक्षिसाच्या रकमेतून निवडक पुस्तके घेऊन जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना वाटली जातील असे बक्षीस स्वीकारताना रतीलाल बाबेल यांनी सांगितले. या यशाबद्दल रतिलाल बाबर यांचे जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Previous articleगुळाणीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी
Next articleनारायणगाव पोलीस स्टेशनची अवैध्य धंद्यांवर कारवाई