खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

नारायणगाव ( किरण वाजगे )

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड येथील मराठा समाज बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ‘एक मराठा लाख मराठा ‘ म्हणत आपल्या मागण्या व  मराठा आरक्षणासाठी सारथी व मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील खासदार कोल्हे यांच्या कार्यालयासमोर कोल्हे मळा येथे हे आंदोलन केले.

जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आक्रोश मोर्चा आंदोलन सुरू आहेत. राज्यातील मंत्री, खासदार व आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन ही आंदोलने शांततेत सुरु आहेत. या आंदोलनाद्वारे मराठा सामाजाच्या मागण्या मांडण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार व अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्या जन्मगावात असलेल्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निवेदन दिले. खासदार कोल्हे यांचे बंधू व माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे यांनी हे निवेदन स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे पाठपुरावा करतील असे दिलीप कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

Previous article“शिव ज्योत परिवार ” यांनी प्राचीन शिलाहार काळातील मंदिराचे केले संवर्धन
Next articleदौंडचे गटविकास अधिकारी डॉ.अजिंक्य येळे यांचा कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाने केला सत्कार