खेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

राजगुरुनगर- खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आज तहासिलदार कचेरीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे हीच एक मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय मराठा आंदोलक सहभागी झाले होते.

 मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर मराठा आंदोलक पुन्हा एकदा राजआक्रमक झाला आहे.मराठा आरक्षण स्थगितीविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. खेड तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने आज (दि. ५ ) रोजी तहसिलदार कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मराठ्यांच्या आरक्षणाबाबत सरकाराचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी टाळ, पखवाद घेऊन भजन म्हणत धरणे आंदोलन केले.आम्ही एवढे आंदोलन केले, अनेकांनी जीव दिले. राज्य सरकार मराठा आरक्षण न्यायालयात टिकवू शकले नाही. मराठा समाज ठिकठिकाणी आंदोलन करतोय तरीही सरकारला जाग नाही. मात्र मराठा समाजाला फुसके आश्वासन मिळतात, अशी टीका मराठा आंदोलकांनी सरकारवर यावेळी केली. सध्याच आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे परंतु जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आंदोलनाच स्वरूप तीव्र करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला. सोशल डिस्टनसिंग पाळून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

यावेळी सकल मराठा समाज आणि  शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट ) या पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलकांनी हिंसक होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.आंदोलकांनी घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती आरगडे, माजी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, नगरसेवक शंकर राक्षे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे, संतोष नाना डोळस, मनिषा टाकळकर, मराठा क्रांती मोर्चाचे वामन बाजारे, क्रांती कराळे, अनिल राक्षे, सुदाम कराळे, अमित टाकळकर, प्रमोद वाडेकर, मनोहर वाडेकर ,रुपाली राक्षे, दिपक थिगळे, चेतन शेटे, अक्षता कान्हुरकर, तुषार सातकर आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान नायब तहसिलदार मालती धोत्रे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Previous articleजरेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
Next articleग्रामपंचायत काळुस तर्फे कोरोनायोध्द्यांचा सन्मान व महिला बचत गटांना मसाला गिरणी व शेवई यंत्रांचे वाटप