देशातील नागरिक सक्षम बनवण्यासाठी प्राथमिक शिक्षण महत्वाचे – जि.प सदस्य वीरधवल जगदाळे

दिनेश पवार,दौंड

देशातील नागरिक सक्षम बनवायचे असतील तर प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतून तयार होणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडेवाडी (बोरिबेल)येथे जगदाळे यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद पुणे,पुणे जिल्हा नियोजन मंडळ तसेच लोकसहभागातून 13 लक्ष रुपयांच्या निधीतून एक वर्ग खोली आणि अंगणवाडी इमारतीचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा गुरूवार (दि.1) रोजी जि.प सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय पाचपुते होते.

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्या सौ.ताराबाई देवकाते, दौंड नगरीचे नगरसेवक बादशहाभाई शेख, दौंड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष वसीम भाई शेख,बोरिबेल गावच्या प्रथम नागरिक भाग्यश्री ताई पाचपुते, ग्रा. पं सदस्य नंदकिशोर पाचपुते, अरविंद जगताप, दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे , एकात्मिक बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी करण धुमाळ , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, केंद्रप्रमुख हरिश्चंद्र गाढवे,जाकीर तांबोळी, संतोष पवार ,महादेव बंडगर तसेच शिंगाडे वाडीतील ग्रामस्थ आणि तरुण मंडळी उपस्थित होते.

यावेळी गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांनी बोलताना शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू असून ज्यांच्याकडे मोबाइल सारखी साधने उपलब्ध नसतील अशा विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता पुस्तकातून किंवा मिळेल त्या साधनाने अभ्यास पूर्ण करावा. त्यासाठी आत्महत्यासारखे मार्ग अवलंबू नयेत.तसेच अशा विद्यार्थ्यांना आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन केले.

याप्रसंगी शाळेसाठी उस्फूर्तपणे मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे सत्कार बोरीबेल ग्रामपंचायतचे सदस्य भाऊसाहेब शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक किरण कोल्हे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर उपशिक्षिका पारखे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous articleदौंडमध्ये कोरोना योध्यांचा सन्मान
Next articleकास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन संपन्न