युपीत पत्रकार विमा योजना सुरु मग महाराष्ट्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष का करतंय ? एस एम देशमुख यांचा सवाल

अमोल भोसले,पुणे

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील पत्रकारांना विमा योजना लागू करीत असेल आणि कोरोनानं मृत्यू झाल्यानं पत्रकारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देत असेल तर अशी योजना महाराष्ट्र सरकारने का सुरू करू नये ? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे..
उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पत्रकारांचा प्रत्येक वर्षी पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा उतरविण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे.तसेच ज्या पत्रकाराचे कोरोनानं निधन होईल त्यांच्या नातेवाईकांना दहा लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील योगी सरकारने घेतला आहे.योगी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र सरकारनं देखील राज्यात अशाच प्रकारची योजना सुरू करावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी पत्रकात केली आहे.

महाराष्ट्रात पत्रकार विमा योजना सुरू करावी या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली पत्रकार सातत्यानं मागणी करीत आहेत.याच मागणीसाठी आणि कोरोनानं मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने 18 सप्टेंबर रोजी राज्यभर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच आऱोग्य मंत्री राजेश टोपे यांना आठ हजार एसएमएस पाठवून विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली मात्र सरकारने अजून यासंबंधीचा निर्णय घेतला नसल्याने महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठी नाराजी असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.देशमुख म्हणाले,’आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोनानं मृत्युमुखी पडणार्‍या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती.मात्र दिलेले शब्द सरकारने अजून तरी पाळलेला नाही,तेव्हा सरकारने पत्रकारांचा आता जास्त अंत न पाहता तातडीन ज्या पत्रकारांचं कोरोनानं निधन झालंय त्यांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी’ .

31 पत्रकारांचे कोरोनानं बळी

31 जुलै नंतर राज्यात 31 पत्रकारांचे कोरोना किंवा कोरोनासदृश्य आजारानं निधन झालं आहे.आजही राज्यातील पन्नास पेक्षा जास्त पत्रकार राज्याच्या विविध भागातील रूग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत मात्र सरकारने पत्रकारांसाठी अद्यापही उपचारासाठी विशेष काहीच योजना आखलेली नाही.पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेटिलेटरची सोय असलेले बेड त्वरित उपलब्ध करून द्यावेत ही मागणी देखील सरकारनं अजून पूर्ण केली नसल्याने एस एम देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तेव्हा सरकारने तातडीने विमा योजना लागू करावी ,50 लाखाची नुकसान भरपाई द्यावी ,आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी देशमुख यांनी मागणी केली आहे..

Previous articleदौंड तालुक्याची प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी जाहीर
Next articleदौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा दान; प्लाझ्मा दान करण्याचे आमदार कुल यांचे आवाहन