समाज प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न तातडीने व सकारात्मकरित्या सोडविणार – सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

वाढदिवसाच्या जाहिरात

नारायणगाव (किरण वाजगे)

मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधन करणाऱ्या लोकनाट्य तमाशा मधील व इतर लोककलावंतांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लोककलावंतांच्या मागण्या सकारात्मकरीत्या सोडवून कलावंतांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात दिले.

दोन दिवसांपूर्वी नारायणगाव येथे ज्येष्ठ तमाशा फड मालक व महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व आमदार अतुल बेनके यांनी कलावंतांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार आज बुधवार दिनांक २३ रोजी मुंबई येथील मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीसाठी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, आमदार अतुल बेनके अध्यक्ष रघुवीर खेडकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, अभिनेते सुशांत शेलार यांच्यासह तमाशा फड मालक मालती इनामदार, शांताबाई संक्रापूरकर, राजू बागुल, राजू गायकवाड, शफी भाई शेख, खंडूराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतीक मंत्री देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड-१९ परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील कलाकारांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाटय सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांचे  नुकसान होत आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंत यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी कल्याणकारी मंडळ असावे, कलावंतांना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांना देण्यात आले.
याविषयी ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी शासनाचे आभार मानताना इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे देखील आभार मानले आहेत.

Previous articleकर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशन आणि साम्राज्य संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Next articleपत्रकार प्रमोद झालटे यांच्यावर हल्ला करणाऱ्या वर कडक कारवाई करण्याची पुरोगामी पत्रकार संघ दौंड ची मागणी